येत्या २४ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका संघातील ३ टी२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका संपल्यानंतर उभय संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी बुधवारी (२३ फेब्रुवारी) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत हे येत्या काळात कर्णधार बनण्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने तिन्ही क्रिकेट प्रकाराचा कर्णधार बनल्यानंतर काय वाटते याबद्दल आणि भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतींबद्दलही चर्चा केली आहे.
तिन्ही क्रिकेट प्रकाराचा कर्णधार बनणे गर्वाची गोष्ट
विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी संघाचा नवीन कर्णधार बनला आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तिन्ही क्रिकेट प्रकाराचा कर्णधार बनल्यानंतर रोहितने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की, “तिन्ही क्रिकेट प्रकारात भारताचे नेतृत्व करणे मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. तसेच ही शानदार भावना आहे. अजूनही खूप आव्हाने आमच्या समोर आहेत. मला कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खुश आहे.”
जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रिषभ पंत भारतीय संघाचे भविष्य
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देत रोहित म्हणाला की, “यामुळे काहीही फरक पडत नाही की, तो फलंदाज आहे की गोलंदाज. क्रिकेट हा डोक्याने खेळण्याचा खेळ आहे आणि बुमराहकडे ते कसब आहे. मी त्याला चांगल्याप्रकारे ओळखतो. मला माहितीये की, त्याच्याकडे कशाप्रकारचं क्रिकेटसाठीचं डोकं आहे.”
“तुम्ही बुमराह केएल राहुल आणि रिषभ पंतबद्दल बोलत असाल, तर या खेळाडूंना भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. हे तिन्ही खेळाडू येत्या काळात भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी असलेल्या हक्कदारांपैकी एक असतील.”
संजू सॅमसनमध्येही आहे उत्तम प्रतिभा
संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात परतला आहे. सॅमसन परतल्यावर भारतीय कर्णधार रोहित म्हणाला की, “संजू सॅमसनमध्ये अतुलनीय प्रतिभा आहे. त्याची फलंदाजी पाहताना तुम्हाला मजा येईल. सॅमसनकडे कौशल्ये आहेत, प्रतिभा त्याच्यात भरलेली आहे. फक्त त्याला सामन्यात उतरवणे गरजेचे आहे. भारतात अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्याकडे प्रतिभा आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती मैदानावर दाखवणे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “सॅमसनचा बॅकफूटवरील खेळ अप्रतिम आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स आहेत. संजू जे शॉट्स खेळतो ते खेळणे खूप अवघड असते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात अशा फलंदाजाची गरज आहे. आशा आहे की, तो त्याच्या प्रतिभेचा उपयोग करेल.”
कशी असेल भारतीय संघाची मधली फळी?
रोहितला जेव्हा भारतीय संघाच्या मधल्या फळीबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, “मी आता याबद्दल विचार करत नाहीये. टी२० विश्वचषकापूर्वी आम्हाला खूप सामने खेळायचे आहेत आणि आमचे लक्ष्य सध्याच्या मालिकेवर आहे.”
सूर्यकुमारच्या दुखापतीबद्दल चिंता
हेअरलाईन फ्रॅक्चरमुळे सूर्यकुमार यादव हा श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातून बाहेर झाला आहे. तो बाहेर झाल्यानंतर रोहित म्हणाला की, “सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे. सूर्याची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. इतर खेळाडू आहेत जे त्यांच्या संधीची वाट पाहत आहेत, पण मला सूर्यकुमारचे वाईट वाटते. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण सत्य हे आहे की तुम्ही दुखापती रोखू शकत नाही. तो लवकर बरा व्हावा अशी माझी इच्छा आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, आणखी लोकही त्यांच्या संधीची वाट पाहत आहेत, आता त्यांना संधी मिळेल आणि ते स्वतःला सिद्ध करतील.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला की, “वरिष्ठ खेळाडूंना दुखापत आणि तरुण खेळाडूला संधी मिळावी, असे मला वाटत नाही. मी स्वत: जखमी झालो आहे आणि मला माहितीये की परत येणे कठीण आहे. तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. कोणालाही दुखापत होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. होय, आम्ही प्रत्येक सामन्यात सर्वांना खेळवू शकत नाही, परंतु खेळाडू बदलले जातात आणि आम्हाला खेळाडूंना एकदम ताजेतवाणे ठेवायचे आहे.”
भारतीय संघ गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर श्रीलंकेविरुद्ध पहिला टी२० सामना खेळेल. यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची आणि एक वाईट गोष्ट अशी की, श्रीलंका संघाचा गोलंदाज वनिंदू हसरंगा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-