इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स या संघाला सर्वाधिक 5 विजेतीपदं जिंकून देणारा कर्णधार म्हणजे रोहित शर्मा. रोहित सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्याचा संघ गुणतालिकेच्या तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा हा धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. रोहितच्या खराब कामगिरीवरून आजी-माजी खेळाडूंनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. अशात यामध्ये आणखी एका माजी खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. या खेळाडूने रोहितविषयी खळबळजनक भाष्य केले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याविषयी मोठे भाष्य करणारा खेळाडू इतर कुणी नसून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन गंगा (Daren Ganga) आहे. डॅरेन याने भाष्य करत म्हटले आहे की, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या रोहितने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यातून विश्रांती घेतली पाहिजे.
काय म्हणाला डॅरेन?
डॅरेनने यावेळी रोहितचे गुणगानही गायले. तो म्हणाला की, “तो नक्कीच एक गुणवान खेळाडू आहे. आपण आधीही पाहिलंय की, अनेक खेळाडू खराब फॉर्ममधून गेले आहेत. नुकतेच विराट कोहली हादेखील खराब काळातून गेला होता. त्याचाही फॉर्म चांगला नव्हता. मात्र, विराट चांगल्या फॉर्ममध्ये परतला आणि त्याने धावा केल्या.”
पुढे बोलताना डॅरेन म्हणाला की, “रोहितही अशाच स्थितीतून जात आहे, जिथे तो खूपच जास्त क्रिकेट खेळत आहे. कधीकधी एक खेळाडू म्हणूनही तुम्हाला कर्णधाराच्या रूपात मिळणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे थकवा येऊ शकतो. थोड्या काळासाठी क्रिकेटपासून दूर झाल्यामुळे रोहितला पुढील आव्हानांसाठी ताजेतवाने होण्यास मदत मिळेल.”
रोहित डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त यावर्षीच्या अखेरीस भारतातच होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतही भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करेल. “तुम्ही ऐकलं असेल की, सुनील गावसकर यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी विश्रांती घेणे आणि स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याचा सल्ला दिला होता. हा त्याच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो,” असेही पुढे बोलताना डॅरेन म्हणाला.
रोहित शर्माची आयपीएल 2023मधील कामगिरी
आयपीएल 2023 स्पर्धेत रोहित शर्मा खूपच संथ गतीने फलंदाजी करत आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 17.36इतक्या कमी सरासरीने फक्त 191 धावा केल्या आहेत. अशात 7 ते 11 जून दरम्यान पार पडणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची चिंता वाढली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हल या मैदानावर पार पडणार आहे. (captain rohit sharma should take rest before wtc final said this former cricketer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अनुष्कासाठी चुकीचा शब्द वापरणाऱ्या पॅपराजीला विराटचे मजेशीर उत्तर, व्हिडिओ तुफान व्हायरल
विजयी मार्गावरून घसरलेल्या राजस्थान रॉयल्सबाबत दिग्गजाचे मोठे वक्तव्य, म्हणाला, “तुम्ही हरण्यासाठी…”