Shubman Gill can create history: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यानंतर दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाईल. हा सामना जिंकून मालिकेत मजबूत पकड मिळवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल, तर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत मैदानात उतरेल. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलला इतिहास रचण्याची संधी आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला हे करता आलेलं नाही. (Shubman Gill Captaincy Record)
दुसरा कसोटी सामना एजबॅस्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या मैदानावर भारतीय संघाने आजपर्यंत एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. कोणत्याही भारतीय कर्णधाराला या मैदानावर भारतीय संघाला कसोटी सामना जिंकून देता आलेला नाही. पण जर गिलने या मैदानावर भारतीय संघाला कसोटी जिंकून दिली, तर तो असा करणारा पहिला कर्णधार ठरेल. भारतीय संघाने आतापर्यंत बर्मिंगहॅममध्ये एकूण 8 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 1 सामना ड्रॉ झाला आहे. भारताने पहिल्यांदा या मैदानावर 1967 मध्ये कसोटी सामना खेळला होता. पण अजूनपर्यंत भारताने बर्मिंगहॅममध्ये एकही सामना जिंकलेला नाही. (India’s Test Record at Edgbaston)
बर्मिंगहॅमच्या मैदानावर आतापर्यंत एकूण 8 भारतीय कर्णधारांनी नेतृत्व केले आहे. सर्व कर्णधारांना प्रत्येकी 1 कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. या कर्णधारांमध्ये अजित वाडेकर, एस. वेंकटराघवन, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या कर्णधारांनी प्रत्येकी एका सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. (Indian Captains at Edgbaston)