२००१ मध्ये एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलकाता येथे हा कसोटी सामना झाला. या सामन्याचे खरे नायक म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड तसेच या सामन्यातील तिसरा नायक हरभजन सिंग होता ज्याने सामन्याला शेवटपर्यंत नेले. पण या सामन्यात आणखी एक फिरकीपटू होता त्याने काही खास कामगिरी केली नाही, पण मार्क वॉची विकेट घेत क्रिकेटला निरोप दिला. तो म्हणजे भारतीय संघाचा माजी फिरकीपटू म्हणजे वेंकटपति राजू. राजू अगदी युजवेंद्र चहल सारखा सडपातळ अंगाचा. यामुळे मैदानावर खेळाडू त्याला गमतीने “मसल” असे चिडवत असत.
१९९० मध्ये झाला संघात प्रवेश
१९९० च्या दशकात तीन फिरकीपटूंनी भारतीय संघामध्ये प्रवेश केला. ते फिरकीपटू म्हणजे अनिल कुंबळे, राजेश चौहान आणि व्यंकटपति राजू. राजूने मनिंदर सिंगच्या जागी संघात प्रवेश केला.
राजूने अगदी लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वयाच्या १६ व्या वर्षी, तो मोहम्मद अझरुद्दीन, शिवलाल यादव यांच्यासारख्या दिग्गजांसह रणजी ट्रॉफी खेळत होता. त्याला इतक्या लहान वयात दिग्गजांसोबत खेळण्याचा फायदाही झाला आणि त्याला यश मिळत राहिले.
वर्ष १९८९-९० च्या देशांतर्गत सामान्यांत राजूने हैदराबादसाठी खेळत होता. त्यावेळी त्याने असा खेळ दाखवला की त्याला थेट भारतीय संघात प्रवेश मिळाला. राजूने १९८९-९० च्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३२ बळी घेतले आणि बिशन सिंग बेदीच्या मार्गदर्शनाने मोहम्मद अझरुद्दीनच्या संघात दाखल या खेळाडूची वर्णी लागली.
न्यूझीलंडच्या जलद खेळपट्टीवर राजूची पहिली कसोटी
राजू १२ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळला. त्याची क्षमता खूप अफाट होती. त्याच्या पहिल्या दौर्यापासून त्याने केवळ आपल्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. परंतु, त्यावेळी न्यूझीलंडचे फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यास तितके प्रभावी नव्हते. हीच गोष्ट राजूने पकडली. त्या दौर्यावर बिशन सिंग बेदी संघाचे प्रशिक्षक होते आणि ते खेळाडूंना अधिक चांगल्याप्रकारे समजावून सांगायचे.
न्यूझीलंडमध्ये राजू समोर एकच समस्या होती. त्यावेळी भारतात सोनेक्सचा चेंडू वापरला जात होता, तर न्यूझीलंडमध्ये तो कुकाबुरा चेंडू वापरात होता. सोनेक्स चेंडूवर मोठी शिवण केलेली पट्टी असायची, तर कुकाबुराच्या चेंडूवर अतिशय चांगली आणि बारीक शिवण होती. त्यावेळी कोणत्याही फिरकी गोलंदाजासाठी ही मोठी समस्या होती.
पण नशीब म्हणा वा आश्चर्यकारक, राजूने पहिल्या डावात मार्टिन क्रोची पहिलीच विकेट घेतली. त्या विकेटनंतर राजूचा आत्मविश्वासही वाढला. कारण त्यावेळी न्यूझीलंडचे असे दोनच फलंदाज होते जे फिरकी गोलंदाजी चांगले खेळायचे. त्यापैकी एक जॉन राइट आणि दुसरा मार्टिन क्रो होता.
त्या सामन्यात राजूची गोलंदाजी कमालीची झाली. तिथे कोणी भारतीय प्रेक्षक नव्हता. यामुळे तो कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता किवी फलंदाजांना चेंडू टाकत राहिला. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. आणि ८६ धावा देऊन किवी संघाच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
पहिल्याच सामन्यात नाईट वॉचमन म्हणून मैदानात
एवढेच नव्हे तर पहिल्याच सामन्यात त्याने धैर्यही दाखवले. अझरने त्याला तीन गडी बाद झाल्यानंतर नाईट वॉचमन म्हणून पाठवले आणि राजू दोन तासांपेक्षा जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहिला.
सुरुवातीच्या काळात, राजू हैदराबादमध्ये अन-कवर्ड खेळपट्ट्यांवर बरेच क्रिकेट खेळाला. तेथे तो श्रीनाथ सारख्या अनेक वेगवान गोलंदाजांना खेळायचा. पण एकापाठोपाठ तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार अझरने राजूला सांगितले, “तुला नाईट वॉचमन म्हणून जावे लागेल.” राजू हसला आणि म्हणाला –
“ठीक आहे, पहिल्याच कसोटीत नाइट वॉचमन, काही हरकत नाही.”
आणि असे बोलून त्याने मैदानात उतरण्याचे मान्य केले. त्या डावात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा क्रमांकाचा फलंदाज होता. त्या डावात त्याने १३५ मिनिटे फलंदाजी केली आणि ३१ धावा केल्या.
पण पुढच्याच सामन्यात त्याला पुन्हा सचिन तेंडुलकरबरोबर फलंदाजीची संधी मिळाली. सचिन नेपियर येथे ८८ धावांवर खेळत होता. राजू त्याला साथ देण्यासाठी आला. सचिनने मॉरिसनचा पहिल्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर, पुढच्याच चेंडूवर सचिनने जोरदार फटका मारला आणि धाव घेतली. त्यावेळी ते चौथी धाव घेण्यासही धावले, पण राजू त्याला म्हणाला –
“बॉस जरा आरामात ”
यानंतर, सचिन शतक पूर्ण करण्याआधीच बाद झाला. त्या सामन्यात सचिन बाद झाला नसता तर तो क्रिकेट इतिहासातील सर्वात युवा शतकवीर ठरला असता.
कर्टनी वॉल्शने तोडला राजूचा हात
यानंतर राजूलाही इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघात स्थान देण्यात आले. पण मालिका सुरू होण्याआधी टूर सामन्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध खेळत असताना कर्टनी वॉल्शच्या चेंडू त्याच्या डाव्या हाताला लागला आणि तो दुखापतग्रस्त झाला. यामुळे त्याला दौरा सर्ध्यावर सोडून परत भारतात यावं लागले.
त्या सामन्यात ग्लॉस्टरशायरविरुद्ध भारतीय संघाची अवस्था १२०/६ अशी होती. किरण मोरे फलंदाजी करीत होते. राजू क्रीजवर आला आणि दोन-तीन षटक आरामात खेळला. म्हणजेच की जर एखाद्या गोलंदाजाने वॉल्शसारख्या दिग्गज संघासमोर आरामात झेंडू खेळू शकला असेल तर तो साहजिकच दिग्गज खेळाडूंना राग हा येणारच. त्याने वॉल्शची दोन-तीन निर्धाव षटके खेळली, यामुळे वॉल्श याला राग आला. त्याने डीप इन-कटर चेंडूचा मारा केला जो थेट राजूच्या हातावर बसला. पण दुखापदग्रस्त असतानाही राजू खेळत राहिला.
वास्तविक किरण मोरेने फिजिओ अलीला सांगितले की, त्याला खेळूदे .राजू खेळत राहिला आणि खेळताना त्याचा हात तुटला. हाताबरोबरच, राजूचे इंग्लंडमध्ये खेळण्याचे स्वप्नही तुटले होते.
विरोधी संघाने बॉल बॉय मानले आणि हा सहा गडी बाद करून गेला
हात ठीक झाला होता आणि प्लास्टर उतरवला होता. भारताचा श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका होती. आता राजूला तिसरी कसोटी खेळायची होती. यावेळी इंग्लंडमध्ये जे काम करू शकला नाही, ते त्याला श्रीलंकेविरुद्ध करायचे होते, तसे राजूने यावेळी ठरवले होते. चंदीगडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात त्याने १२ धावा देऊन ६ बळी मिळवले. यातही त्याने एका स्पेलमध्ये केवळ २ धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात श्रीलंकेच्या संघ एक-एक धाव जोडून फक्त ८२ धावा करु शकला.
खरंतर राजू त्या सामन्यासाठी अंतिम अकारामध्ये नव्हता. तो बारावा खेळाडू होता. इतकेच नाही तर श्रीलंकन या खेळाडूला बॉल बॉय म्हणून मानत होते. त्या सामन्यासाठी रवी शास्त्रीला डावखुरा फिरकीपटू म्हणून निवडण्यात आले होते. नरेंद्र हिरवाणी आणि गोपाळ शर्मा हे ही संघात होते. पण या अंतिम आकाराच्या यादीत राजूचे नाव नव्हते. पण सामन्याच्या दिवशी चंडीगडची विकेट शास्त्रीने पाहताच त्यांना धक्का बसला. तो स्पष्टपणे म्हणाला –
“मी या खेळपट्टीवर गोलंदाजी करणार नाही. मी डावाची सुरुवात करेन आणि तुम्हाला हवे असल्यास राजूला खेळवा.”
या खेळपट्टीवर राजूची गोलंदाजी चालणार हे शास्त्रीला समजले होते. परंतु कर्णधार अझर हा निर्णय घेत नव्हते. कारण आता शेवटच्या क्षणी राजूला संघात आणणे म्हणजे एक फलंदाज संघातून वगळण्यात येणार. परंतु शास्त्रीने कर्णधाराला सांगितले की मी डावाची सुरुवात करणार आणि राजूला खेळवावे.
राजूचा हा भारतातील पहिला कसोटी सामना होता. बऱ्याच दिवसानंतर भारतीय संघ घराच्या मैदनावर कसोटी खेळणार होता. राजूने पहिलीच स्पेलमध्ये आपली लय दाखवली. खरं तर, या सामन्यात राजू खेळण्यापूर्वी मार्वन अटापट्टू आणि रोमेश रतनायके राजूला बॉल बॉय मानत होते. पण नंतर त्यांना समजले की तो भारतीय संघाचा फिरकीपटू आहे, तेव्हा त्या सामन्यात राजूने सहा विकेट्स घेतल्या होत्या.
या चमकदार खेळासाठी राजूला ‘सामनावीर पुरस्कार`’ देण्यात आला. हा सामना भारताने एक डाव आणि ८ धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाजाने बाऊन्सर चेंडू टाकला, राजूने मिशा खेचल्या
कितीही घट्ट मैत्री असो, कितीही वैर असो आहे किंवा कितीही मैदानावर स्पर्धा असो, परंतु एखाद्या खेळाडूने दुसर्या खेळाडूची मिशी खेचल्याची घटना क्वचितच घडली असेल. पण १९९१ च्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे ही कसोटी सुरु होती. ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य शरीरयष्टीचा अनुभवी गोलंदाज मर्व ह्यूज्सने शरीराने बारीक, सडपातळ दिसत असलेल्या राजूला बाउन्सर चेंडू फेकला. चेंडू राजुच्या थेट हेल्मेटला लागला.
ह्यूज्स रागाने डोळे करून धष्टपुष्ट शरीराने राजूच्या दिशेने गेला, राजू दुबळा काय करेल तो शांतपणे खेळत राहिला. त्यावेळी संघ एकत्र प्रवास करायचे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ब्रिस्बेन ते पर्थ या विमानात होते. फ्लाइटमध्ये खेळाडू हलके-फुलक्या मूडमध्ये होते. काही जण मद्यपान करीत होते, तर काही झोपी गेले होते.
पण राजू, सचिन सारख्या काही तरुण खेळाडूंनी खोडसाळपणा करण्याचा विचार केला. राजूला वाटले, याने मला भीती दाखवली होती. आता मी त्याचा बदला घेईन. राजू सरळ मर्व ह्यूज्सकडे गेला. त्यावेळी मर्व ह्यूज्सस वर्तमानपत्र वाचत होते. राजू त्याला म्हणाला –
“हे बिग फेलो”
ह्यूज्सने राजूला पाहिले आणि शांत बसला. पण राजू पुन्हा म्हणाला,
“मी तुझ्याशी बोलत आहे.”
ह्यूज्स पटकन वळून म्हणाला,
“काय समस्या आहे.”
मग राजू म्हणाला,
“तू माझ्याकडे रागाने का पाहत होतास ? तुम्हाला माहिती आहे, मी बाउन्सर मारू शकत नाही.”
ह्यूज्स मोठ्या आवाजात म्हणाला,
“आम्ही असेच खेळतो.”
तेवढ्यात राजू शांत बसला आणि ह्यूज्सकडे पाहत म्हणाला,
“मला तुझी मिशा आवडत नाही”
असे म्हणत त्याने ह्यूज्सच्या मिशा खेचल्या आणि सर्व खेळाडू हे शांतपणे पाहू लागले. मात्र, या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू राजूवर चांगलाच संतापले. पण नंतर ह्यूज्स आणि राजू चांगले मित्र झाले.
जेव्हा एकाच मालिकेत लाराला चार वेळा केले बाद
१९९४ मध्ये तीन सामन्यांत राजुने २० बळी घेतले. तेव्हा वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत त्याची चमकदार कामगिरी झाली. यात दोनदा ५ विकेटही घेतल्या. खास गोष्ट म्हणजे त्या मालिकेत राजूने ब्रायन लाराला एकदा किंवा दोनदा नव्हे तर चार वेळा बाद केले. तेही अशा वेळी जेव्हा अनिल कुंबळे त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये नव्हता.
त्या मालिकेमध्ये राजूचे वेस्ट इंडिजशी वेगळे संबंध जुळले. राजू जेव्हा वेस्ट इंडियन्सची विकेट घेत होता, तेव्हा वेस्ट इंडीयन खेळाडू रागावले नाहीत. कारण त्याच्या हसण्यावर ते हसत होते. ते राजूला म्हणाले –
“तुझं हसणं अगदी मिस्टर बीनसारखे आहे.”
यानंतर वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी त्याला मिस्टर बीन म्हणायला सुरवात केली, तर ‘मसल’ हे नाव दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी त्याला त्याच्या सडपातळ शरीरयष्टीमुळे दिले होते.
पण या मालिकेनंतर त्याच्या कामगिरीला उतरती कळा लागली. या मालिकेनंतर पुढच्या सात कसोटी सामन्यांमध्ये त्याने फक्त १२ विकेट्स घेतल्या. यानंतर, तो संघातूनही आतबाहेर राहिला.
१९९९-२००० मध्ये त्याने पुन्हा एकदा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले. रणजीच्या मोसमात खूप चांगली कामगिरी केली होती. त्याने ५२ विकेट्स घेत हैदराबादला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत नेले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – कोलकाता – २००१
२००१ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्धची कोलकाता कसोटी त्याच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक कसोटी ठरली, ज्यामध्ये त्याने मार्क वॉची एकमेव विकेट घेतली आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटला रामराम केले.
या मालिकेत कुंबळेच्या दुखापतीचा फायदा राजूला मिळाला होता. भज्जीसमवेत तोही संघात दाखल झाला होता.
वर्ष १९९२ आणि १९९६ विश्वचषकात संघाचा एक भाग होता
राजूने भारतासाठी १९९६ आणि १९९६ असे दोन विश्वचषकदेखील खेळले. परंतु, संघासाठी चांगली कामगिरी करूनही तो संघात नियमित राहिला नाही. अनिल कुंबळेसमोर संघात जागा मिळवणे त्याच्यासाठी कधीही सोपे नव्हते.
देशातील खेळपट्ट्यांवर राजूची कामगिरी उत्तम होती. घराच्या मैदानांवर खेळलेल्या १६ कसोटी सामन्यांमध्ये राजूने ७१ बळी घेतले पण परदेशात १२ सामन्यांत त्याला फक्त २२ विकेट घेता आले.
२००१ मध्ये शेवटची कसोटी खेळल्यानंतर त्याने २००४ मध्ये निवृत्तीची घोषणा केली. कसोटी व्यतिरिक्त या खेळाडूने वनडे कारकीर्दीत ५३ सामन्यात ६३ बळीही घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाचे-
गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज