‘रनमशीन’, ‘किंग’ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा जगप्रसिद्ध विस्फोटक खेळाडू म्हणजे विराट कोहली होय. विराट वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याच्या जबरदस्त शतकाच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशला 7 विकेट्सने पराभूत करत विजयी ‘चौकार’ मारला. पुणे येथील एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात विराटने वनडे कारकीर्दीतील 48वे शतक झळकावले. यादरम्यान विराटने एक अनोखा कारनामा केला. बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीने एका चेंडूत 14 धावा केल्या. आता यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विराटने पुण्यात घडवला इतिहास
खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 17व्या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 256 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 41.3 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात 261 धावा करत सामना खिशात घातला.
यादरम्यान भारताच्या डावातील 13वे षटक बांगलादेशकडून हसन महमुद टाकत होता. त्याच्या या षटकात एका चेंडूत 14 धावा चोपल्या गेल्या. हा कारनामा विराट कोहली (Virat Kohli) याने केला. झाले असे की, या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक 48 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. यावेळी विराटने आपल्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर 2 धावा घेतल्या, पण हा नो-बॉल होता. त्यानंतर फ्री हिट मिळाल्यावर विराटने चौकार मारला, पण दुर्दैवाने हादेखील नो-बॉल राहिला. यानंतर पुढच्या फ्री हिटवर विराटने गगनचुंबी षटकार मारला. अशाप्रकारे विराटने एका चेंडूवर 14 धावा (14 runs in 1 ball) केल्या. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
विराटचे शतक
भारतीय संघाला जेव्हा विजयासाठी 20 धावांची गरज होती, तेव्हा विराट कोहली (Virat Kohli) यालाही शतकासाठी 20 धावांचीच गरज होती. त्यानंतर विराटने जबरदस्त वेग पकडला आणि शानदार शतक झळकावत भारताला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.
यादरम्यान केएल राहुल यानेही विराटची चांगली साथ दिली. विराटच्या या सामन्यात 97 चेंडूंचा सामना करताना 103 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. हे विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 78वे शतक होते. (centurion virat kohli scored 14 runs in 1 ball against bangladesh created impossible to break record in world cup 2023 video viral)
हेही वाचा-
विराटच्या शतकासाठी अंपायरने केला मोठा गेम, मुद्दाम नाही दिला वाईड बॉल? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराटने शतक ठोकल्यानंतर हजारो प्रेक्षकांपुढे मागितली जडेजाची माफी; म्हणाला, ‘मी विश्वचषकात…’