कोरोना व्हायरसदरम्यान संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा तेरावा हंगाम खेळण्यात येणार आहे. आज (१९ सप्टेंबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता आयपीएलचा पहिला सामना खेळला जाईल. हा सामना अबु धाबी येथे कट्टर विरोधी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. दरम्यान अनेक मोठमोठे खेळाडू मैदानावर उतरतील. पण या दोन्ही संघात असे काही दमदार खेळाडू आहेत, ज्यांच्या प्रदर्शनावर संघाचा जय-पराजय अवलंबून असेल. Chennai Super Kings And Mumbai Indians 6 Key Players
तर बघूयात कोण आहेत, ते ६ खेळाडू…
एमएस धोनी
आयपीएल २०२०च्या पहिल्या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी तब्बल एका वर्षानंतर क्रिकेट मैदानावर पुनरागमन करणार आहे. त्याने यापुर्वी शेवटचा क्रिकेट सामना जुलै २०१९मध्ये विश्वचषकात खेळला होता. जरी धोनीने एवढ्या दिवसांपासून क्रिकेट खेळलेले नसले, तरी चेन्नई संघाला त्याच्यातील प्रतिभेवर विश्वास आहे.
गतवर्षी या धुरंदर खेळाडूने पूर्ण हंगामात १५ सामने खेळत सर्वाधिक ४१६ धावा केल्या होत्या. यासह तो चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यावर्षीही धोनीकडून असेच दमदार प्रदर्शन करण्याची अपेक्षा आहे. जर धोनीने आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी प्रदर्शन केले, तर नक्कीच आजचा सामना चेन्नई जिंकू शकेल.
दिपक चाहर
गेल्या २ आयपीएल हंगामांपासून वेगवान गोलंदाज दिपक चाहर हा चेन्नई संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. तो सहसा पावरप्लेमध्ये गोलंदाजी करतो आणि त्याच्या स्विंग गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना धूळ चारतो. आज मुंबईविरुद्धही चाहर कमालीचे गोलंदाजी प्रदर्शन करु शकतो.
तसेच, अबु धाबी येथील खेळपट्टीवर त्याला बराच फायदा होऊ शकतो. या खेळपट्टीवर सुरुवातीच्या षटकात त्याच्या गोलंदाजीला हवा तसा स्विंग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला बऱ्याच विकेट्स मिळू शकतात. यापुर्वी चाहरने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना तब्बल २ वेळा बाद केले आहे. आजही जर त्याने हा कारनामा केला, तर नक्कीच आजचा सामना चेन्नई जिंकेल.
ड्वेन ब्रावो
गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा क्रिकेटच्या तिन्ही विभागात चमकदार कामगिरी करणारा ड्वेन ब्रावो हा चेन्नईच्या मॅट विनर खेळाडूंपैकी एक आहे. नुकतेच त्याने आपल्या सीपीएलमधील ट्रिंबँगो नाईट रायडर्स संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेला ब्रावो सीपीएलप्रमाणे आयपीएलमध्येही आपल्या चेन्नई संघासाठी कमालीचे प्रदर्शन करताना दिसू शकतो.
याव्यतिरिक्त ब्रावोची मुंबईविरुद्धची आकडेवारीही चांगली आहे. त्याने आतापर्यंत मुंबईविरुद्ध खेळताना सर्वाधिक २८ विकेट्स आणि २८१ धावांची कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जाणारा रोहित शर्मा याचे सुरुवातीला आयपीएलमधील फलंदाजी प्रदर्शन जास्त विशेष राहिले नाही. पण हा धुरंदर गतवर्षी जोरदार फॉर्ममध्ये होता. त्याने गतवर्षी १५ सामने खेळत ४०५ धावा कुटल्या होत्या. यावर्षीही संघाला त्याच्याकडून अशाच दमदार प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
रोहित आज चेन्नईविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी उतरु शकतो. अशात जर त्याने सलामीला दमदार फटकेबाजी करत धावा करण्यास सुरुवात केली. आजचा सामन्याचा निकाल मुंबईच्या बाजूने लागू शकतो.
कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड हा आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मॅच विनर खेळाडू ठरु शकतो. पोलार्डचा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्येही हातखंडा आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या सीपीएल २०२०मध्ये कमालीचे प्रदर्शन केले आणि आपल्या ट्रिंबँगो संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.
पोलार्डचा हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहायला मिळू शकतो. जर त्याने आजच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही चमकदार प्रदर्शन केले, तर आजचा विजय मुंबईच्या खात्यात नोंदवला जाईल.
जसप्रीत बुमराह
मुंबईचा दमदार गोलंदाज लसिथ मलिंगाच्या गैरहजेरीत गोलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. तो आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे नेहमीच चेन्नईवर भारी पडला आहे. त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला तब्बल ३ वेळा पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. याबरोबरच त्याला युएईच्या मैदानावर चेंडूला अतिरिक्त बाउन्सर मिळू शकतो. त्यामुळे त्याला विकेट्स चटकावणे सोपे जाईल.
ट्रेंडिंग लेख –
पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ
या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार
आयपीएलमध्ये फक्त ‘याच’ देशातील मीडियाला असेल परवानगी