गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या एका 17 वर्षीय फलंदाजानं चक्क महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केलं आहे. आयुष म्हात्रे असं या खेळाडूचं नाव असून तो मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्याच्या फलंदाजीनं प्रभावित होऊन चेन्नई सुपर किंग्जनं त्याला ट्रायलसाठी बोलावलंय.
रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात भाग घेतल्यानंतर आयुष लगेच ट्रायलसाठी गेला. सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मेल करून या फलंदाजाला ट्रायलसाठी येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. म्हात्रे याला नवलपूरच्या मैदानावर ट्रायलसाठी बोलावण्यात आलंय. 24-25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल मेगा लिलावापूर्वी त्याच्यासाठी ही मोठी संधी आहे.
17 वर्षीय आयुष म्हात्रे यानं गेल्या महिन्यातच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे झालेल्या इराणी कप सामन्यात त्यानं मुंबईसाठी सलामी दिली होती. त्याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच प्रथम श्रेणी सामना होता. या सामन्यात तो सपशेल फ्लॉप झाला. पहिल्या सामन्यात त्याचा स्कोअर 19 आणि 14 होता. असं असूनही मुंबई संघानं त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आणि त्याला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
आयुषनं बडोद्याविरुद्ध रणजी पदार्पणाच्या सामन्यात 52 धावांची खेळी खेळली. मात्र दुसऱ्या डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यानंतर महाराष्ट्राविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात त्यानं रणजी करंडक आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक झळकावलं.
आयुषनं त्याच्या फर्स्ट क्लास करिअरची सुरुवात चांगली केली आहे. आतापर्यंत त्यानं पाच प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्याच्या नऊ डावांमध्ये त्यानं सुमारे 36च्या सरासरीनं 321 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं. म्हात्रेनं अद्याप टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या संभाव्य खेळाडूंमध्ये त्याचं नाव आहे.
हेही वाचा –
“गौतम गंभीरची बोलण्याची पद्धत योग्य नाही, त्याला मीडियापासून दूर ठेवा”, संजय मांजरेकरांचा बीसीसीआयला सल्ला
काय सांगता! माजी भारतीय क्रिकेटपटूचा मुलगा लिंग बदलून मुलगी झाला
वातावरण टाईट! विराट कोहलीच्या फॉर्मवरून गंभीर-पाँटिंगमध्ये तू-तू मैं-मैं