आयपीएल 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सीएसकेनं 78 धावांनी शानदार विजय मिळवला. मात्र या विजयानंतर चेन्नईसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आहे.
वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. ऋतुराजला क्षेत्ररक्षण करताना डावाच्या 15व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर फिजिओही मैदानात आले होते. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नसली तरी तो मैदानावर अडचणीत दिसला होता. अशा स्थितीत त्याच्या दुखापतीमुळे हंगामाच्या मध्यात चेन्नईसमोर मोठं संकट उभं राहू शकतं.
ऋतुराज गायकवाड कर्णधारासोबतच फलंदाज म्हणूनही संघासाठी यशस्वी ठरत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला शतक झळकावता आलं नाही. मात्र त्यानं 54 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 98 धावांची धमाकेदार खेळी खेळली. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 181.48 एवढा होता. यापूर्वी, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं शतक झळकावताना नाबाद 108 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऋतुराज गायकवाड आता चांगल्याच फॉर्ममध्ये आला आहे. ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत तो विराट कोहली नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या बॅटमधून 9 सामन्यांत 63.86 च्या सरासरीनं 447 धावा निघाल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 149.50 एवढा राहिला.
चेपॉक येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 20 षटकात 3 विकेट गमावून 212 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय डॅरिल मिशेलनं अर्धशतकी खेळी खेळली. त्यानं 32 चेंडूत 52 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 18.5 षटकांत 134 धावांवर ऑलआऊट झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादचे ‘बिग हिटर्स’ सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी, घरच्या मैदानावर चेन्नईचा 78 धावांनी विजय