दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी पार पडला. या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली. चेन्नईचे हे चौथे आयपीएल विजेतेपद ठरलं आहे. त्यामुळे संघाचं विजयानंतर हॉटेलमध्ये परतल्यावर जोरदार स्वागत झालं.
चेन्नई संघाच्या हॉटेलमध्ये परतल्यानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की संघाची बस जेव्हा हॉटेलबाहेर येते, तेव्हा हॉटेलमधील स्टाफ आणि खेळाडूंचे कुटुंबिय संघातील सदस्यांची हॉटेलमध्ये प्रवेश करण्याची वाट पाहातात.
यावेळी चेन्नई संघाकडून विजेतेपदाच्या ट्रॉफीसह ऋतुराज गायकवाड पहिल्यांदा हॉटेलमध्ये प्रवेश करतो. त्याच्या पाठोपाठ धोनी आणि इतर सदस्य हॉटेलमध्ये येतात. यावेळी सर्वजण त्यांचे शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात तसेच ‘सीएसके… सीएसके…’ असा नारा देत स्वागत करतात. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर धोनी तिथे असलेला केक ऋतुराजला कापण्यास सांगतो आणि त्यानंतर ऋतुराजला केकचा पहिला घास भरवतो. त्यानंतर धोनी दीपक चाहरसह इतर सदस्यांना केक भरवतो. यानंतर खेळाडू सर्वांसोबत वेळ घालवताना आणि सेलिब्रेशन करताना दिसतात.
https://www.instagram.com/p/CVEDl5Io2u_/
चेन्नईच्या विजयात ऋतुराजचा मोलाचा वाटा
चेन्नई संघासाठी ऋतुराजची कामगिरी यंदाच्या हंगामात सर्वात महत्त्वाची ठरली. त्याने १६ सामन्यांत ४५.३५ च्या सरासरीने ६३५ धावा केल्या. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला मिळणारी ऑरेंज कॅपही पटकावली.
A welcome back with Whistles and Cheers! 🥳💛#SuperCham21ons #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/ecqC6FFWKe
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 16, 2021
चेन्नईचे चौथे विजेतेपद
अंतिम सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी चेन्नई संघ उतरला. चेन्नईकडून सलामीला फलंदाजीसाठी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसने या सामन्यांत ५९ सामन्यांत ८६ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने ऋतुराज गायकवाडसह(३२) ६१ धावांची, रॉबिन उथप्पासह(३१) ६३ धावांची, तर मोईन अलीसह(३७*) ६८ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत ३ बाद १९२ धावा करता आल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरेल्य कोलकाताला १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर(५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी अर्धशतके केली. पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे चेन्नईने चौथे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला विजेतेपद जिंकून देणारे प्रशिक्षक आता टी२० विश्वचषकात बनवणार धोनीला हरवण्याचा प्लॅन
चेन्नईचे कट्टर समर्थक आहात ना? मग ‘या’ आठ जणांविषयी तुम्हाला माहीतच हवे