दुबई। एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध क्वालिफायर १ सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने या विजयासह नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. यामुळे चेन्नईने एक मोठा विक्रम केला आहे.
चेन्नई आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा अंतिम सामन्यात प्रवेश करणारा संघ आहे. चेन्नईने आत्तापर्यंत १४ आयपीएल हंगामांपैकी १२ हंगामात सहभाग घेतला आहे. त्यातील ११ वेळा चेन्नई संघाने प्लेऑफ म्हणजेच बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर, ११ वेळा प्लेऑफमध्ये खेळताना विक्रमी ९ वेळा अंतिम सामना गाठला आहे.
चेन्नईने यापूर्वी २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१८ आणि २०१९ साली आयपीएलच्या अंतिम सामन्यांत प्रवेश केला आहे. यातील २०१०, २०११ आणि २०१८ साली चेन्नईला विजेतेपद मिळवण्यात यश आले आहे. तर, २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ साली चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या संघांच्या यादीत चेन्नई पाठोपाठ मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबईने ६ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या ६ अंतिम सामन्यांपैकी ५ सामन्यांत त्यांनी विजय मिळवत विजेतेपद जिंकले आहे. तसेच आत्तापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ३ वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने २ वेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
चेन्नईचा रोमांचक विजय
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण, दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि रिषभ पंतने अर्धशतकं करत दिल्लीला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात हातभार लावला. तसेच पंतबरोबर शिमरॉन हेटमायरने केलेली ८३ धावांची भागीदारीही महत्त्वाची ठरली.
शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तसेच पंतने ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. तर हेटमायरने ३७ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईकडून फाफ डू प्लेसिस १ धावेवर बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने डाव सांभाळत चेन्नईला भक्कम स्थितीत उभे केले. या दोघांनी ११० धावांची भागीदारी करताना वैयक्तिक अर्धशतकंही केली. उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. तर, ऋतुराजने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली.
पण, उथप्पा १४ व्या, तर ऋतुराज १९ व्या षटकात बाद झाला. आणि चेन्नईने मधल्या काही षटकांत महत्त्वाच्या विकेट्सही गमावल्या होत्या. त्यामुळे अखेरीस चेन्नई संघ संकटात सापडला होता. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण, यावेळी कर्णधार एमएस धोनीने त्याच्या जुन्या अंदाजात फलंदाजी केली आणि तीन चौकारांसह चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनी ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांवर नाबाद राहिला. तर मोईन अलीनेही १६ धावांची पण महत्त्वपूर्ण छोटेखानी खेळी केली. चेन्नईने १९.४ षटकांत १७३ धावा पूर्ण करुन सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘माही’ बडे दिल वाला! रडणाऱ्या चिमुकीलाला धोनीकडून मिळाले सर्वात भारी गिफ्ट; तुम्ही पाहिलं का?
खेल नहीं इमोशन है! चेन्नईचे विकेट्स पडताना पाहून चिमुकली लागली रडू; पण धोनीने मॅच केली ‘फिनिश’
‘अँड द किंग इज बॅक’ विराटही झाला ‘फिनिशर’ धोनीचा फॅन; ‘थाला’नं विजयी चौकार ठोकताच केलं खास ट्वीट