जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामावर कोरोना व्हायरसचे सावट पसरले होते. परंतु अखेर बीसीसीआयने संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये आयपीएलचे आयोजन केले. अशा या आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबर म्हणजे आजपासून होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. हा सामना आज रात्री ७.३० वाजता अबु धाबी येथे खेळला जाईल. तसं तर, कट्टर विरोधक असणाऱ्या या दोन्ही संघांना यावर्षी विजयाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. पण या लेखात आपण आयपीएलचा दूसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाविषयी जाणून घेणार आहोत. Chennai Super King’s Strength And Weakness
चला तर सुरुवात करुया…
आयपीएलच्या १२ हंगामांच्या इतिहासात चेन्नईची आकडेवारी उल्लेखनीय राहिली आहे. २०१६-१८ या २ हंगामात निलंबित करण्यात आल्यामुळे चेन्नई संघ आतापर्यंत १० हंगामात खेळताना दिसला आहे. विशेष म्हणजे, या १० हंगामांपैकी ८ हंगामात चेन्नईने अंतिम सामना गाठला आहे. त्यापैकी २०१०, २०११ आणि २०१८ या ३ हंगामात चेन्नईने आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. तर २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये संघ उपविजेता ठरला आहे.
क्रिकेटमधील सर्वात छोट्या स्वरुपाला म्हणजेच टी२० क्रिकेटला युवा खेळाडूंचा खेळ म्हणून ओळखले जाते. पण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या मालकीच्या चेन्नई संघात अधिकतर वयस्कर खेळाडूंची भरमार आहे. २ वर्षांच्या निलंबनानंतर २०१८मध्ये जेव्हा चेन्नईने पुनरागमन केले, तेव्हा संघात युवा खेळाडूंपेक्षा जास्त अनुभवी खेळाडूंना निवडण्यास प्राथमिकता देण्यात आली. आणि याच वयस्कर खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाचे संघाला तिसऱ्यांदा विजेता बनवले.
आयपीएल २०२०मध्येही संघाने प्रमुख खेळाडूंमध्ये जास्त बदल केलेले नाहीत. केवळ सॅम करन, जॉश हेजलवूड, साई किशोर आणि पियुष चावला या नव्या खेळाडूंना संघात दाखल करण्यात आले. परंतु यावर्षी मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग हे वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे कर्णधार धोनीपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
त्यातही रैनाच्या जागी पर्यायी खेळाडू शोधणे हे धोनीसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. कारण रैना हा २००८ पासून चेन्नई संघाचा सदस्य होता. सोबतच त्याने दरवर्षी संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशात आता रैनाच्या ठिकाणी महाराष्ट्रीय युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच तमिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीशन, मुरली विजय हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. तर याउलट हरभजनचा पर्यायी खेळाडू शोधण्यासाठी धोनीला जास्त मेहनत करावी लागणार नाही. कारण संघात आधीपासूनच अनेक फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यातही जलज सक्सेनाला जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे.
तसं पाहिलं तर, संघातील सर्व खेळाडूंमुळे एक संघ मजबूत बनतो. पण चेन्नई संघाची सर्वात मोठी ताकद आहे, एमएस धोनी. धोनीची दमदार फलंदाजी, उत्कृष्ट यष्टीरक्षण आणि त्याची शानदार नेतृत्त्वपद्धती यांचा संघाला नेहमीच फायदा झाला आहे. याबरोबच संघातील बरेच खेळाडू गेल्या काही वर्षांपासून संघाचे सदस्य असल्यामुळे त्याला प्रत्येकाची पारख आहे. याच गोष्टी चेन्नईला यावर्षीही विजयाचा प्रबळ दावेदार बनवतात.
तसेच चेन्नईकडे शेन वॉटसन, अंबाती रायडू असे ताबडतोब खेळी करणारे सलामीवीर फलंदाज उपलब्ध आहेत. तर, मधल्या फळीतील जबाबदारी धोनी, फाफ डू प्लेसिस, केदार जाधव यांच्या खांद्यावर असेल. शिवाय दिपक चाहर, लुंगी एनडिगी, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, इमरान ताहिर आणि मिचेल सेंटनर हे एकपेक्षा एक खतरनाक गोलंदाज संघाची ताकद अजून वाढवतात.
पण ज्याप्रकारे नाण्याला २ बाजू असतात, त्याप्रमाणे चेन्नई हा कितीही मजबूत संघ असला तरी त्यांचीही काही-ना-काही कमजोरी असणारच आणि संघाच्या उणिवेचाच विरुद्ध संघ मोठ्या प्रमाणात फायदा उचलतात.
चेन्नईची सर्वात मोठी कमजोरी आहे, त्यांची पावरप्लेमधील फलंदाजी. गतवर्षी संघाने पावरप्लेमध्ये जवळपास दर षटक ६.५० धावा केल्या होत्या. याबरोबरच पावरप्लेमध्ये ३० विकेट्सही गमावल्या होत्या. अशाप्रकारे इतर सहभागी संघांच्या तुलनेत चेन्नईचे पावरप्लेमधील प्रदर्शन खूप दुर्दैवी होते.
याबरोबरच डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी, ही देखील चेन्नईची सर्वात मोठी कमजोरी आहे. आतापर्यंत चेन्नईकडून डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी ड्वेन ब्रावोच्या खांद्यावर होती. पण गतवर्षी त्याला डेथ ओव्हर्समध्ये चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्याने ११ इकोनॉमी रेटने धावा दिल्या होत्या. त्यामुळे धोनीला यावर्षी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी दूसरा दमदार गोलंदाज शोधावा लागणार आहे.
पण उणिवा असूनही चेन्नई त्यांचा सामना करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, संघ यंदा चौथ्यांदा ट्रॉफी पटकावत आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सची बरोबरी करण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात अशी असेल रोहितची मुंबई इंडियन्स!
-‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
महत्त्वाच्या बातम्या-
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
-सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा
-काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद