१९ सप्टेंबर २०२०, आजची तारिख… अखेर तो दिवस उजाडला आहे, ज्याची सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहात होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ७.३० वाजल्यापासून जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. अबु धाबी येथे कट्टर विरोधी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात या हंगामातील पहिलाच सामना खेळला जाईल.
आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात यशस्वी २ संघ जेव्हाही आमनेसामने येतात, तेव्हा त्यांच्यात कडी टक्कर पाहायला मिळते. आजचा सामनाही असाच रोमांचक असेल. तत्पुर्वी कर्णधार एमएस धोनीच्या चेन्नईला पराभूत करण्यासाठी रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना मैदानावर उतरवेल?, याची सर्वांना उत्सुकता लागली असेल. तसेच लसिथ मलिंगाचा जागा कोणता खेळाडू घेईल?, हा प्रश्नही सर्वांना सतावत असेल.
या लेखात, आम्ही आजच्या सामन्यातील मुंबईच्या संभावित प्लेइंग इलेव्हन संघाचा आढावा घेतला आहे.
असा असेल मुंबई इंडियन्सचा संभावित प्लेइंग इलेव्हन (Mumbai Indians Probable Playing XI) –
१. क्विंटन डी कॉक
दक्षिण आफ्रिकाचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने गतवर्षी मुंबईकडून सलामीला फलंदाजी करत संघाला विजेता बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. गतवर्षी त्याने पूर्ण हंगामात १६ सामने खेळत ५२९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या तब्बल ४ अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळे हा धुरंदर यंदाही त्याच्या जोरदार प्रदर्शनाने संघाला ५व्यांदा विजेता बनवण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
२. ख्रिस लिन
आयपीएल २०२० लिलावात मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज ख्रिस लिनला २ कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे हा खेळाडू नक्कीच मुंबईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. तो क्विंटन डी कॉकसोबत सलामीला फलंदाजीची भूमिका निभावू शकतो. आजवर तो डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता.
क्रिस लिनने त्याच्या ८ वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत ४१ सामने खेळले आहेत त्यात त्याने वरच्या फळीत फलंदाजी करताना १२८० धावा केल्या आहेत.
३. सूर्याकुमार यादव
आयपीएलच्या ५व्या हंगामात सर्वात यशस्वी अशा मुंबई संघाने २०१२मध्ये प्रथम यादवला ताफ्यात दाखल केले होते. मुंबईने तब्बल ३ लाख २० हजार रुपयांची बोली लावत त्याला विकत घेतले होते. पण सुरुवातीच्या २ वर्षात त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही आणि अखेर २०१४ साली त्याला संघातून बाहेर केले. पण त्यानंतर २०१८ साली मुंबईने त्याला परत आपल्या संघात सामील केले. यावेळी पूर्ण हंगामात ५१२ धावा करत तो सर्वाधिक धावा करणारा मुंबईचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला.
एवढेच नाही तर, गतवर्षी मुंबई इंडियन्सला चौथे जेतेपद मिळवून देण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याने २०१९च्या पूर्ण हंगामात १६ सामन्यात ४२४ धावा केल्या होत्या. यासह तो क्विंटन डी कॉकनंतर (५२९) मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा दूसरा फलंदाज ठरला होता. त्यामुळे यावर्षीही त्याला वरच्या फळीत फलंदाजीला पाठवले जाऊ शकते.
४. रोहित शर्मा
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जाणारा रोहित शर्मा याचे सुरुवातीला आयपीएलमधील फलंदाजी प्रदर्शन जास्त विशेष राहिले नाही. पण हा धुरंदर गतवर्षी जोरदार फॉर्ममध्ये होता. त्याने गतवर्षी १५ सामने खेळत ४०५ धावा कुटल्या होत्या. यावर्षीही संघाला त्याच्याकडून अशाच दमदार प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
५. हार्दिक पंड्या
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या हा गेल्या ५ वर्षांपासून मुंबई संघासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. त्याने गतवर्षी ४४.६६च्या सरासरीने अफलातून फलंदाजी प्रदर्शन करत ४०२ धावा केल्या होत्या. यावेळी त्याची सर्वाधिक धावसंख्या ९१ इतकी राहिली होती. फलंदाजीसह पंड्या गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन करु शकतो. त्याने गतवर्षी १४ विकेट्स चटकावल्या होत्या.
६. क्रुणाल पंड्या
अष्टपैलू क्रिकेटपटू क्रुणाल पंड्या हा मधल्या फळीत शानदार फलंदाजी करण्याची क्षमता राखतो. गतवर्षी या धुरंदरने संघासाठी १८३ धावा केल्या होत्या. सोबतच तो गोलंदाजीतही माहिर आहे. महत्त्वाचे म्हणजे क्रुणाल हा फिरकीपटू आहे आणि युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर आहेत. त्यामुळे तो यावर्षी आपल्या गोलंदाजी प्रदर्शनाने संघाला ५व्यांदा विजेता बनवू शकतो.
७. कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड हा आयपीएल २०२०मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा मॅच विनर खेळाडू ठरु शकतो. पोलार्डचा फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्येही हातखंडा आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या सीपीएल २०२०मध्ये कमालीचे प्रदर्शन केले आणि आपल्या ट्रिंबँगो संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. पोलार्डचा हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहायला मिळू शकतो.
याबरोबरच पोलार्डने गतवर्षी चेन्नईविरुद्ध अंतिम सामन्यात २५ चेंडूत नाबाद ४१ धावा करत, संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
८. राहुल चाहर
कर्णधार रोहित फिरकीपटू राहुल चाहरला संघातील अंतिम ११ खेळाडूंमध्ये सहभागी करु शकतो. यामागचे मुख्य कारण म्हणजे, युएईतील मैदाने. राहुल फिरकी गोलंदाजी करतो, त्यामुळे अधिकाधिक विकेट्स घेत संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. गतवर्षी राहुलचे प्रदर्शन जास्त चांगले राहिले होते. त्याने पूर्ण हंगामात १३ सामने खेळत १३ विकेट्स चटकावल्या होत्या. त्यामुळे तो आपल्या प्रदर्शनात सुधारणा करत गतवर्षीपेक्षाही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
९. धवल कुलकर्णी
आयपीएल २०२०च्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने धवल कुलकर्णीला ट्रेड करत मुंबई संघात विकत घेतले होते. तो वेगवान गोलंदाजी करण्यासह गरजेनुसार फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे कर्णधार रोहित कुलकर्णीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देईल. आजवर कुलकर्णीने आयपीएलमध्ये ९० सामने खेळत ८६ विकेट्स चटकावल्या आहेत.
१०. जसप्रीत बुमराह
मुंबईचा दमदार खेळाडू लसिथ मलिंगा याची कमी जसप्रीत बुमराह पूर्ण करु शकतो. या शिलेदाराने गतवर्षी मुंबईकडून खेळताना सर्वाधिक १९ विकेट्स चटकावल्या होत्या. त्याच्या वेगवान गोलंदाजीपुढे अनेक मोठमोठे फलंदाजही चित होतात. याव्यतिरिक्त तो आयपीएलचा दूसरा सर्वात यशस्वी संघ चेन्नईवर नेहमीच भारी पडला आहे. त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला तब्बल ३ वेळा पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
याबरोबरच त्याला युएईच्या मैदानावर चेंडूला अतिरिक्त बाउन्सर मिळू शकतो. त्यामुळे त्याला विकेट्स चटकावणे सोपे जाईल.
११. ट्रेंट बोल्ट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला आयपीएलमध्ये जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त ३३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८ विकेट्स चटकावल्या आहेत. आयपीएल २०२० लिलावात मुंबईने बोल्टला दिल्ली कॅपिटल्समधून ट्रेड करत आपल्या संघात सामाविष्ट केले होते. त्यामुळे कर्णधार रोहित नक्की बोल्टला आजमावू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केली भविष्यवाणी
सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू
आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…