भारतीय क्रिकेटला फलंदाजांचा मोठा वारसा मिळाला आहे. प्रत्येक पिढीमध्ये दिग्गज फलंदाज होऊन गेले. त्यातही २०००- २०१० चे दशक म्हणजे भारतीय फलंदाजीचा सुवर्णकाळ होता. या काळात जे फलंदाज होऊन गेले, त्यात राहुल द्रविड असा एक फलंदाज होता, ज्याला बाद करणे म्हणजे गोलंदाजांसाठी परिक्षा असायची. कारण तो खेळपट्टीवर एकदा स्थिरावला की लवकर विकेट द्यायचा नाही. अशातच तो त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात असतानाच टी२० या वेगवान क्रिकेट प्रकाराला सुरुवात झाली, त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या क्रिकेटमध्ये भारताला परत कधी द्रविड सारखा खेळाडू मिळेल का? असा अनेकांना प्रश्न पडला. पण चेतेश्वर पुजारा नावाच्या खेळाडूने या प्रश्नाला हो असं आपल्या खेळण्यातून उत्तर दिलं. तेव्हापासून तो सध्याच्या भारतीय संघाचा ‘मिस्टर डिपेंडेबल’, ‘द न्यू वॉल’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
घरातूनच मिळालं क्रिकेटचं बाळकडू
पुजाराचा जन्म २५ जानेवारी १९८८ साली गुजरातमधील राजकोट येथे झाला. त्याला क्रिकेट खेळाचं बाळकडू त्याच्या कुटुंबातूनच मिळालं. त्याच्या कुटुंबात क्रिकेटचीच पार्श्वभूमी होती. त्याचे वडील अरविंद पुजारा हे सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. तसेच त्याचे काका बिपीन पुजारा हे देखील सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळले आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच क्रिकेटची गोडी लागलेल्या पुजारामध्येही क्रिकेट खेळण्याची प्रतिभा आहे, हे त्याच्या वडीलांना तो केवळ अडीच वर्षांचा असताना कळालं. त्याचा भावंडाबरोबर क्रिकेट खेळतानाचा फोटो पाहून त्याचा फलंदाजीतील बॅलन्स चांगला असल्याचे त्याच्या वडिलांनी हेरलं होतं.
पुढे त्याच्या वडीलांनी त्याला क्रिकेटची आणखी गोडी लावली. हळूहळू पुजाराही क्रिकेटमध्ये प्रगती करायला लागला. आज पुजारा जरी दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या वडीलांची त्याच्यासाठी असलेली जबदस्त इच्छाशक्ती, मेहनत आणि त्यांनी पुजाराकडून करून घेतलेली तयारी याला बरेच श्रेय जाते.
शिस्तप्रिय वातावरणात वाढला पुजारा
गुजरातमध्ये संक्रांत मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. त्यातही संक्रांतीला पंतग मोठ्या प्रमाणात उडवले जातात. मात्र, पुजाराला त्याच्या वडीलांना पतंग उडवण्याची परवानगी कधीच दिली नव्हती. इतकंच काय तर पुजाराचं बालपण इतकं शिस्तप्रिय असायचं की त्याला कोणत्याही सणांमध्ये भाग घेताना जसं लहानमुले मजामस्ती करतात तशी करण्याची परवानगी नव्हती. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, त्याच्या वडीलांना वाटायचं या मजामस्तीमुळे पुजाराला कोणतीही दुखापत होऊ नये. कारण असं झालं तर त्याचे क्रिकेटवरील लक्ष उडेल.
एकदा पुजारा १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला उन्हाळ्यात मुंबईला घेऊन आले. त्यावेळी त्यांना काही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. पण, तरीही त्यावेळी तो एका आठड्यात तीन सामने आणि महिन्यात १२ सामने खेळायचा.
तसं, पुजारा आत्ता वरच्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. पण त्याने क्रिकेटची सुरुवात अष्टपैलू म्हणून केली होती. मात्र, नंतर भारताचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी त्याच्या वडिलांना त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. पुजारासाठी घावरी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे पुजाराने त्याचे शालेय शिक्षण ज्या विराणी स्कूलमधून घेतले, याच शाळेतून घावरी यांनी देखील शिक्षण घेतले आहे.
वयोगटातील क्रिकेट स्पर्धा गाजवल्या
पुजारामध्ये भविष्यातील मोठा फलंदाज दडला आहे, फार लहान वयातच दिसून आलं होतं. कारण २००१ मध्ये १२ वर्षांचा असताना त्याने १४ वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून ३०६ धावांची खेळी केली होती. बडोदा विरुद्ध केलेली ही खेळी पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली, असे पुजारा म्हणतो.
पण, त्याने सर्वांना त्याची दखल घ्यायला लावली ती २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात. त्या विश्वचषकात त्याने सर्वाधिक धावा करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता.
अधिक वाचा – ‘फॉर्म तात्पुरता, पण दर्जा कायम’, चेतेश्वर पुजाराचे टीकाकारांना चोख उत्तर
आयुष्यातील कठीण काळ
वयोगटातील क्रिकेट गाजवत असतानाच पुजारासाठी सर्वात कठीण काळ आला तो २००५ साली. त्यावर्षी त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. पुजारासाठी हा मोठा धक्का होता. कारण, तो भावनिकरित्या त्याच्या आईशी खूप जोडलेला होता. विशेष म्हणजे पुजाराला त्याची पहिली बॅट आणि बॉल त्याच्या आईनेच भेट दिला होता. एवढेच नव्हे तर, पुजारा ८ वर्षांचा झाल्यानंतर त्याला क्रिकेटचा सराव करताना बॅटिंग पॅडची गरज होती. परंतु तो उंचीला छोटा असल्याने त्याला बाजारातील पॅड व्यवस्थित येत नसत. त्यामुळे त्याच्या आईने स्वत:च्या हातांनी पुजारासाठी पॅड तयार केले होते.
व्हिडिओ पाहा – नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालं आंतरराष्ट्रीय पदार्पण
आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी मात्र पुजाराला २०१० साल उजाडण्याची वाट पाहावी लागली. त्याने बंगळूरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबर २०१० मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. कारकिर्दीच्या पहिल्या ४ वर्षातच त्याने २ शतकं, २ दिडशतकं आणि २ द्विशतकं झळकावली होती. त्याच्या कामगिरीची दखल घेत आयसीसीने त्याला २०१३ साली दयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कार देऊ केला. पुजाराने पुढेही त्याच्या याच संयमी खेळीने भारतीय संघातील स्थान पक्कं केलं. तो तिसऱ्या क्रमांकावरचा भरवशाचा फलंदाज झाला. २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौरा तर त्याने गाजवलाच, पण २०२१ मध्ये ऐतिहासिक गॅबा कसोटीत ऑसी गोलंदाज तिखट बाऊंसरचा मारा करत असताना शरीरावर जखमा झेलत देखील तो खेळपट्टीवर उभा राहिला. पुजाराने अनेकदा अशा खेळी केल्या आहेत. त्याचमुळे आजही तो संघात जागा टिकवून आहे.
पण सध्या तो फॉर्ममध्ये नसल्यानं त्याच्यावर चारही बाजूंनी टीकाही होत आहे. पण असं असलं तरी हे ही खरं आहे की, पुजाराने इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याच्या आई-वडीलांसह बरीच मेहनत आणि त्याग केला आहे आणि त्याचंच आज चीज झालं आहे.
पुजाराने आत्तापर्यंत भारताकडून ९५ कसोटी सामने खेळताना ४३.८७ च्या सरासरीने ६७१३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १८ शतकांचा आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ५ वनडे सामने खेळले असून ५१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीने टेस्ट कॅप्टन्सी सोडायच्या दिवशी नक्की काय झालं होतं? जाणून घ्या ‘ईनसाईड स्टोरी’
“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव