येत्या १८ ते २२ जून दरम्यान जागतिक क्रिकेटमधील महामुकाबला इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाईल. पहिल्यावाहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना या दरम्यान खेळवला जाणार आहे. तीन वर्षांपासून खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत अव्वल दोन क्रमांक राखलेले भारत आणि न्यूझीलंडचे संघ या सामन्यात आमनेसामने असतील.
या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून साऊथम्पटनच्या हॉटेलमध्ये आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करत आहे. हा कालावधी समाप्त होताच, भारतीय संघ सरावाला सुरुवात करेल. मात्र या सामन्याआधी भारतीय संघाला मधल्या फळीतील फलंदाजांची चिंता भेडसावते आहे. खासकरून कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजाराचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे.
पुजाराचा हरवलेला फॉर्म
चेतेश्वर पुजारा विद्यमान भारतीय कसोटी संघाचा मुख्य आधारस्तंभ मानल्या जातो. तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करणार्या पुजारावर भारताच्या फलंदाजीची मोठी भिस्त असते. मात्र गेल्या काही काळापासून पुजाराचा फॉर्म हरवल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ऑगस्ट २०१९ पासून पुजाराने आत्तापर्यंत १७ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने २९.२१ च्या सरासरीने ८१८ धावा केल्या आहेत. यात केवळ नऊ वेळा त्याने ५० धावांची वेस ओलांडली आहे. तर २८ डावांमध्ये त्याने अजून एकही शतक झळकवलेले नाही आहे.
खरंतर पुजाराची संपूर्ण कारकिर्दीतील सरासरी ४६.५९ इतकी आहे. या तुलनेत केवळ २९ची सरासरी त्याच्या सारख्या फलंदाजाला शोभा देणारी नाही. तिसर्या क्रमांकावरील फलंदाजाने केवळ शतकच नव्हे तर त्याहून मोठी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देणे, कसोटी क्रिकेटमध्ये महत्वाचे असते. मात्र पुजाराचा धावांचा दुष्काळ भारतीय संघाच्या मनसुब्यांत अडथळा आणणारा ठरतो आहे. त्यामुळे जर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडला पराभूत करायचे असेल, तर पुजाराने या उणीवेवर मात करून फॉर्मात परत येणे, आवश्यक असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या काळ्या अध्यायाचे खलनायक, अवघ्या ३२व्या वर्षी विमान अपघातात झाला दुर्दैवी मृत्यू
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंड संघ ठरतोय भारतासाठी घातक, १ वेळा हिसकावलाय विश्वचषक
‘ट्रान्सफर विंडो’ची सुविधा असती, तर ‘या’ भारतीयांनी गाजवली असती परदेशी लीगची मैदाने!