येत्या १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी (८ सप्टेंबर) बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. श्रेयस अय्यरला या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्याच्याऐवजी डाव्या हाताचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.
या संघाची घोषणा झाल्यानंतर भारतीय संघाचे मुख्यनिवडकर्ते चेतन शर्मा यांनी अय्यर ऐवजी ईशान किशनला संधी देण्यामागील खरे कारण काय याचा खुलासा केला आहे.
मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी म्हटले की, “ईशान किशन सलामीला आणि मध्यक्रमात येऊन देखील फलंदाजी करू शकतो. तो एक खेळाडू म्हणून आम्हाला अनेक पर्याय उपलब्ध करून देत आहे. त्याने भारतीय संघासाठी सलामी फलंदाजी केली आहे. त्या सामन्यात त्याने अर्धशतक देखील झळकावले होते. तसेच मधल्या षटकात तो फिरकी गोलंदाजांना देखील चांगले खेळतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “याशिवाय या संघात डाव्या हाताच्या फलंदाजाची आवश्यकता होती. जर विरोधी संघातून डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करत असेल तर, ईशान किशन सारखा आक्रमक फलंदाज महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. श्रेयस अलीकडच्या काळात जास्त क्रिकेट खेळला नाही, म्हणून आम्ही त्याला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे, तर ईशान किशनला संघात स्थान मिळाले.”(Chief selector told why Ishan kishan was given a chance instead of Shreyas iyer)
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
शेवटचा कसोटी सामना होणार की नाही? गांगुली म्हणाला, ‘आम्हाला माहित नाही…”
धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यामागे ‘हे’ आहे मोठे कारण, गांगुलीकडून खुलासा
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा; वनडे, टी२०, कसोटी मालिकेचे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक