इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी मागील आठवड्यात ४ मे रोजी स्थगित करण्यात आला. त्यानंतर काही परदेशी खेळाडू आपापल्या मायदेशी परतले आहेत. तर काही परदेशी खेळाडू त्यांच्या देशांतील प्रवेशाच्या निर्बंधामुळे मालदीवला गेले आहेत. यात पंजाब किंग्सकडून खेळणारा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचाही समावेश आहे. सध्या ख्रिस गेल मालदीवमधील जीवनाची मजा घेताना दिसत आहे. तेथील अनेक व्हिडिओ तो शेअर करत आहे, दरम्यान त्याने असाही एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तो भावूक होऊन रडताना दिसला.
गेलने रविवारी (९ मे) एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्याने हा व्हिडिओ जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने शेअर केला होता. रविवारी जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला. यादिवशी गेलने व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो आईच्या आठवणीत भावूक झाला असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की तो त्याच्या आईची आठवण काढत एक गाणे ऐकत आहे. यादरम्यान तो भावून होऊन रडूही लागतो.

या व्हिडिओच्या स्टोरीवर त्याने लिहिले आहे की ‘मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, माझी आई.’ तसेच त्याने पुढे लिहिले ‘मला तुझ्याबद्दल अभिमान आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो.’ तसेच त्याने पुढच्या स्टोरीवर लिहिले, ‘आई, मला थांबवू नको. मला माहित आहे, तुला माझा अभिमान वाटतो. मला तुझी आठवण येत आहे आणि मी तुला नेहमी हसवत राहिल. मातृदिनाच्या शुभेच्छा.’ या पुढेही त्याने आईसाठी अनेक भावूक करणारे संदेश लिहिले होते.
@henrygayle #chrisgayle #MothersDay #MothersDay2021 pic.twitter.com/y697ZOd4uy
— Prabhat Sharma (@PrabS619) May 10, 2021
ख्रिस गेल सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो नेहमीच विविध व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याने त्याचे एक गाणे युट्यूबवर प्रदर्शित केले होते.
टी२० क्रिकेटमधील हे विक्रम आहेत गेलच्या नावावर
गेल हा नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक अर्धशतके, सर्वाधिक षटकार आणि चौकार मारण्याचे विश्वविक्रमही आहेत. गेलने त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीत ४२४ सामने खेळताना ३७.८६ च्या सरासरीने १३८९८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २२ शतकांचा आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीत १०७३ चौकार आणि १०१७ षटकार मारले आहेत.
गेलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
गेलने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४२.१८ च्या सरासरीने ७२१४ धावा केल्या आहेत. तसेच तो वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत वनडेमध्ये ३०१ वनडे सामन्यात ३७.८३ च्या सरासरीने १०४८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये गेलने ६१ सामने खेळताना ३१.२४ च्या सरासरीने १६५६ धावा केल्या आहेत.
याबरोबरच गेलने कसोटीमध्ये २ त्रिशतकेदेखील केली आहेत. तसेच वनडेमध्ये त्याच्या नावावर एक द्विशतकही आहे. तर टी२० मध्ये त्याने वेस्ट इंडिजकडून २ शतकेही केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फुटबॉल विश्वावर शोककळा! एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या दिग्गज फुटबॉलपटूचे निधन
जेव्हा स्म्रीती मंधना बनवते अंडा-भूर्जी आणि संघसहकारी घेतात तिची फिरकी, पाहा व्हिडिओ






