नवी दिल्ली । कॅरिबियन प्रीमियर लीग २०२०मध्ये खेळणार नसल्याचे वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस गेलने मंगळवारी (२३ जून) सांगितले आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
गेलने (Chris Gayle) हा निर्णय खेळाडूंच्या मसुद्याच्या एक दिवस आधी घेतला आहे. ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, गेलच्या या निर्णयाचे कारण समोर आले नाही. परंतु त्याने आपली फ्रंचायझी सेंट लूसिया ज्यूक्सला याची माहिती दिली आहे.
गेल सीपीएलमध्ये जमैका थलावाह्ज, सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रॉयट्स संघांकडून खेळला आहे. गेलने जमैकाला २वेळा सीपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याचबरोबर त्याने नेव्हिस पॅट्रॉयट्सला २०१७च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
जमैका थलावाह्जने नुकतेच गेलला आपल्या संघातून वगळले होते. त्यानंतर गेल खूप नाराज झाला होता. त्याने जमैकाचे मुख्य प्रशिक्षक रामनरेश सरवान (Ramnaresh Sarwan) यांच्यावर आरोप करत त्यांंना ‘एक विषारी साप’ म्हटले होते. त्याचबरोबर त्याने सरवान यांना कोरोना व्हायरसपेक्षा वाईट असल्याचेही म्हटले होते.
गेल सीपीएलमध्ये (Caribbean Premier League) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने सीपीएलमध्ये २५३४ धावा केल्या आहेत.
कॅरेबियन प्रीमियर लीग १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान सरकारच्या मान्यतेनुसार खेळली जाणार आहे.