बुधवारी(20 फेब्रुवारी) विंडिज विरुद्ध इंग्लंड संघात किंग्सटन ओव्हल मैदानावर पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवत वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने या सामन्यात विजय मिळवला असला तरी विंडिजकडून विक्रमी शतकी खेळी करणाऱ्या ख्रिस गेलने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने या सामन्यात 129 चेंडूत 12 षटकार आणि 3 चौकारांसह 135 धावा केल्या. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 24 वे शतक आहे.
याबरोबर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 444 सामन्यात 488 षटकार मारले आहेत. तसेच त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या 476 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये तीनवेळा 10 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा ख्रिस गेल पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, एबी डिविलियर्स आणि मार्टिन गप्टिलने 2 वेळा वनडेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच गेलने इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचाही टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा टप्पा पार करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात गेलच्या शतकाच्या आणि शाय होपने केलेल्या 64 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 360 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र त्यांचे हे आव्हान इंग्लंडने 48.4 षटकातच 4 विकेट्सच्या मोबदल्यात 364 धावा करत सहज पार केले. इंग्लंडकडून जेसन रॉयने 123 तर जो रुटने 102 धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबईकर श्रेयस अय्यरचा टी२०मध्ये कहर कारनामा
–हार्दिक पंड्या टी२० आणि वनडे मालिकेतून बाहेर, वाचा काय आहे कारण
–चेतेश्वर पुजाराचे व्हर्जन २.०, टी२० सामन्यात केली नाद खेळी!