पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (14 ऑगस्ट) क्विन्स पार्क ओव्हल स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात ख्रिस गेलने खास 301 क्रमांकाची जर्सी घातली होती.
यामागील कारण असे की गेल त्याच्या कारकिर्दीतील 301 वा वनडे सामना खेळत होता. गेल वेस्ट इंडीजचा 300 पेक्षा अधिक वनडे सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे.
गेलने याआधी बऱ्याचदा 333 या क्रमांकाची जर्सी घातली आहे. 333 ही त्याची कसोटीतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे तो 333 या क्रमांकाची जर्सी अनेकदा घालतो.
पण बुधवारी मात्र त्याने त्याच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाच्या टप्प्याचा क्रमांक असलेली जर्सी घातली होती. गेल हा वेस्ट इंडीजचा सर्वाधिक वनडे सामने खेळणारा खेळाडू आहे. हा विक्रम त्याने रविवारी(11 ऑगस्ट) भारता विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खेळताना केला होता. रविवारचा सामना त्याच्या कारकिर्दीतील 300 वा वनडे सामना होता.
🌴v 🇮🇳
Special Edition!👕 Number 301 today to mark his 301st ODI!😎 #WIvIND #MenInMaroon #ItsOurGame pic.twitter.com/5lRLMaD9kV— Windies Cricket (@windiescricket) August 14, 2019
त्याने सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंच्या यादीत ब्रायन लारा यांना मागे टाकले आहे. लारा यांनी 299 वनडे सामने खेळले आहेत. याबरोबरच त्याने लारा यांना वनडेत वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतही मागे टाकले आहे.
गेलने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत वेस्ट इंडीजकडून खेळताना 10425 धावा केल्या आहेत. तर लारा यांनी 10348 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडीजकडून वनडेत 10 हजारांपेक्षा अधिक धावा केवळ या दोन खेळाडूंनाच करता आल्या आहेत.
गेलने बुधवारी झालेल्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत तुफानी अर्धशतक केले. त्याने 41 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांसह 71 धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकाच्या मदतीने वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना 35 षटकात 7 बाद 240 धावा केल्या होत्या. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 35-35 षटकांचा करण्यात आला होता.
तसेच भारताला डकवर्थ लूईस नियमानुसार 35 षटकात 255 धावांचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 4 विकेट्स गमावत 32.3 षटकात पूर्ण केला. त्यामुळे भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकत 3 सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशी जिंकली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–व्हिडिओ: अनेकांनी गेलला दिला निरोप; मात्र गेल म्हणाला, ‘मी अजून निवृत्त झालोच नाही’
–असा पराक्रम करणारा श्रेयस अय्यर युवराजनंतरचा दुसराच भारतीय!
–या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता विराट कोहलीचे नाव सन्मानाने घेतले जाणार!