गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभूत व्हावे लागले. मुंबई इंडियन्स २०१३ पासून आजतागायत स्पर्धेतील आपला पहिला सामना कधीही जिंकले नाहीत. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा दुर्दैवीरित्या धावबाद झाला. मुंबईच्या पराभवाचे हे एक मोठे कारण म्हणता येईल. रोहित धावबाद झाल्यानंतर त्याच्यासोबत खेळत असलेल्या ख्रिस लिनने सामन्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
असा झाला रोहित बाद
पहिल्या दोन षटकात काहीशी संथ सुरुवात केल्यानंतर रोहितने तिसऱ्या षटकात चौकार ठोकला. फिरकीपटू युजवेंद्र चहलने टाकलेल्या चौथ्या षटकात त्याने षटकार देखील ठोकला. मात्र, त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर तो धावबाद झाला. हा चेंडू ख्रिस लिनने कव्हर्सच्या दिशेने ढकलला व एक धाव घेण्यासाठी काही पावले पुढे आला. मात्र, चेंडू सरळ त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीच्या हाती गेल्याने तो तिथेच थांबला. परंतु, नॉन स्ट्राइकला असलेला रोहित शर्मा बराचसा पुढे आला होता व तो परतून माघारी जाईपर्यंत चहलने रोहितला धावबाद केले. रोहितने १९ धावा बनविल्या.
लिनला झाले दुःख
आपल्या पहिल्याच सामन्यात कर्णधाराला धावबाद केल्याचे दुःख लिनला झाले. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मुंबई इंडियन्ससाठी हा माझा पहिलाच सामना होता. रोहित आणि मी पहिल्यांदाच एकत्र खेळत होतो. मला आधी वाटले तिथे एक धाव होऊ शकते. मात्र, तसे नव्हते आणि रोहित धावबाद झाला. मी आधीपासून खूप दबावात आलो होतो. पहिल्याच सामन्यात कर्णधाराला धावबाद करणे दुर्दैवी असते. कदाचित मला पुढील सामन्यात संधी मिळणार नाही. तो अप्रतिम खेळत होता. तो बाद झाल्यामुळे १०-१५ धावांचा फरक पडला आणि त्याचा परिणाम सामन्याचे निर्णयावर झाला.”
पहिल्या सामन्यात आरसीबीचा थरारक विजय
हंगामातील पहिल्या सामन्यात ख्रिस लिन व सूर्यकुमार यादव यांच्या खेळ्यांमुळे मुंबईने आरसीबीसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष ठेवले होते. ग्लेन मॅक्सवेल (३९) व एबी डिव्हिलियर्स (४८) यांच्या योगदानामुळे आरसीबीने अगदी अखेरच्या चेंडूवर दोन गडी राखून ही धावसंख्या पार केली. मुंबईचे पाच गडी टिपणारा हर्षल पटेल सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?
चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?





