CM Eknath Shinde, Olympic Winner Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी (1 ऑगस्ट) भारतासाठी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात वैयक्तिक पदक मिळवणारे मराठमोळे खेळाडू म्हणून केवळ खाशाबा जाधव यांना यश आले होते. त्यांच्यानंतर आता 72 वर्षांनी असाच पराक्रम करून स्वप्नील दुसरा मराठमोळा खेळाडू बनला आहे. त्याच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी स्वप्नीलसाठी मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाला गवसणी घालणाऱ्या स्वप्निलचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. ऑलिम्पिकवीर स्वप्नीलला मुख्यमंत्री शिदेंनी 1 कोटीचं बक्षीस जाहीर केले आहे. तसेच स्वप्नील हा आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना दिले आहे.
दरम्यान स्वप्निलने पदक जिंकलेल्या स्पर्धेत नेमबाजांना तीन पोझिशनमध्ये (बसून, झोपून आणि आणि उभं राहून) निशाणा लावावा लागतो. स्वप्नीलने 50 मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण 451.4 इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर 463.6 होता. तर युक्रेनच्या सेरहीने रौप्य पदक जिंकले.
स्वप्नीलने 2012 मध्ये त्याच्या शूटिंग कारकीर्दीला सुरुवात केली. तो कोल्हापुरच्या कांबळवाडी गावचा असून, त्याचे वडील आणि भाऊ शिक्षक आहेत. तसेच त्याची आई कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत. स्वप्नील 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल 4 पोझिशन्स स्पर्धेत सुवर्णपदक विजेता होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट