पुणे। शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सीएमडीए वॉर्डविझ संघाने पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कुंदन स्पेसेस पीसीएमए युनायटेड संघावर ८ गडी राखून मात करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष होते. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे होते.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील अंतिम लढतीत युनायटेड संघाच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यात अपयश आले. युनायटेड संघाला १२ षटकांत ६ बाद ८७ धावाच करता आल्या. यात अधिश शहाने ३२ चेंडूंत ३८, तर मयुर दारवडेने २२ चेंडूंत २० धावा केल्या. इतरांनी मात्र निराशा केली. वॉर्डविझ संघाकडून प्रफुल्ल मानकरने तीन, तर केतन पासलकरने २ गडी बाद केले.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना प्रफुल्ल मानकर आणि संतोष भेलके यांनी ७३ धावांची सलामी देऊन विजयाचा पाया रचला. प्रफुल्लने ३१ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारसह ३२ धावा केल्या. केतन पासलकर ९ धावा करून माघारी परतला. यानंतर संतोषने गोपाळ बहिरटच्या साथीने एक चेंडू शिल्लक राखून वॉर्डविझचा विजय साकार केला. संतोषने ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या.
स्पर्धेत सर्वाधिक चौकार करीता प्रफुल्ल मानकर (सीएमडीए), सर्वाधिक षटकार संतोष भेलके (सीएमडीए) , उत्कृष्ट फलंदाज संतोष भेलके (सीएमडीए), उत्कृष्ट गोलंदाज महेश धोका (पीएसीएमए) आणि मालिकावीर प्रफुल्ल मानकर (सीएमडीए) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण प्रसंगी फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष संघवी, क्रिकेट नेक्स्ट अकॅडेमिचे विक्रम देशमुख, गार्नेट बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक मनोज ओसवाल, शो टोयोटाचे संचालक जोगिंदर शॉ, योशा च्या संगिता बिहाणी, स्क्वेअर फिट्चे मनोज दर्डा, सचिव महेंद्र पितळीया, अभय व्होरा आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन बक्षीसिंग तलवार, ब्रिजेन शहा, निर्मल शहा, चंदन मुंदडा, संजय खोपडे, दीपक शहा, निलेश सोनिगरा, विजय राठोड, अभय गांधी, कल्पेश शहा, मनोज सारडा, विजय ओसवाल, अरविंद कोठारी, सुभाष पोरवाल, जयंत शेटे, मिठालाल जैन, सुनील मेहता, निलेश लुणावत, ओमप्रकाश मर्दा यांनी केले.
संक्षिप्त धावफलक – कुंदन स्पेसेस पीसीएमए युनायटेड – १२ षटकांत ६ बाद ८७ (अधिश शहा ३८, मयुर दारवडे २०, प्रफुल्ल मानकर ३-१५, केतन पासलकर २-२०) पराभूत वि. सीएमडीए वॉर्डविझ – ११.५ षटकांत २ बाद ८९ (संतोष भेलके नाबाद ४५, प्रफुल्ल मानकर ३२, नरेंद्र ठाकूर १-१०, मनोज मेहता १-१९).