कॅनबेरा। शुक्रवारी(४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला टी२० सामना झाला. या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला. पण भारताच्या विजयापेक्षा अधिक चर्चा भारताने युजवेंद्र चहलला कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून खेळवण्याची झाली.
झाले असे की भारतीय संघाकडून फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाच्या हेल्मेटला मिशेल स्टार्कचा चेंडू आदळला. त्यामुळे तो नंतर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी मैदानात आला नाही. भारताने क्षेत्ररक्षण करण्याआधी सामाधिकारी डेविड बून यांच्या परवानगीने युजवेंद्र चहलला जडेजाचा बदली खेळाडू अर्थात कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून खेळवले. विशेष म्हणजे चहलने या सामन्यात ३ महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
या सामन्यादरम्यान चहलला जडेजाचा बदली खेळाडू म्हणून खेळवण्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर नाराज दिसले. तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मोझेस हेन्रीक्सनेही जडेजा अष्टपैलू क्रिकेटपटू असताना त्याचा बदली खेळाडू फिरकीपटू चहल कसा असू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे आता कन्कशन सब्सटिट्यूटचा नियम नक्की काय आहे, याबद्दल अनेकांना प्रश्न पडला आहे.
नक्की काय आहे कन्कशन सब्सटिट्यूट नियम –
मागीलवर्षी आयसीसीने काही नवीन नियम अंमलात आणले होते. त्यात कन्कशन सब्सटिट्यूटच्या नियमाचाही समावेश होता. या नियमाची अंमलबजावणी मागीलवर्षी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या ऍशेस मालिकेपासून करण्यात आली होती.
खरंतर अनेकदा खेळाडूंना डोक्याला चेंडू लागल्याने त्यांच्या संघाला १ खेळाडूच्या शिवाय म्हणजेच १० खेळाडू घेऊन सामने खेळावे लागले आहेत. त्यामुळे आयसीसीने हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार जर कोणताही खेळाडू डोक्याला किंवा मानेच्या जवळ सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने जखमी झाल्यास बदली खेळाडू संघात सामील होऊ शकतो. तो खेळाडू १२ वा खेळाडूही असू शकतो.
पण असे असले तरी ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त होईल तशाच प्रकारचा बदली खेळाडू असायला पाहिजे. म्हणजेच जर गोलंदाज जखमी झाला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडूही गोलंदाजच असायला हवा. तसेच या बदलासाठी सामनाधिकाऱ्यांची मंजूरी असणे गरजेचे आहे.
याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे हा नियम जर एखाद्या खेळाडूला कोविड-१९ ची लक्षणे आढळली तरी लागू होऊ शकतो.
मार्नस लॅब्यूशाने ठरला होता पहिला कन्कशन सब्सटिट्यूट
या नियमाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम उपयोग मागीलवर्षी ऍशेस मालिकेदरम्यान करण्यात आला होता. दुसऱ्या ऍशेस कसोटीतील पहिल्या डावात जोफ्रा आर्चरचा चेंडू लागून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो उर्वरित सामन्यातून बाहेर पडला. त्याच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्यूशानेची बदली खेळाडू म्हणून निवड केली. लॅब्यूशानेने या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी केली होती.
भारताविरुद्ध वेस्ट इंडिजने केला होता सर्वात आधी कन्कशन सब्सटिट्यूटचा वापर –
मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात किंग्स्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावादरम्यान १३ व्या षटकात डॅरेन ब्रावोच्या हेल्मेटला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चेंडू लागला. त्यामुळे वेस्ट इंडीजने कन्कशन सब्सटीट्यूट या नवीन नियमानुसार ब्रावोला उर्वरित सामन्यातून बाहेर केले. तसेच चालू डावात जर्मन ब्लॅकवूडची बदली खेळाडू म्हणून संघात निवड केली. त्यावेळी भारताविरुद्ध कन्कशन सब्सटिट्यूट नियमाचा वापर करणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला होता. त्या डावात वेस्ट इंडीजकडून 12 खेळाडूंनी फलंदाजी केली.
चहल ठरला भारताचा पहिला कन्कशन सब्सटिट्यूट –
गेल्या वर्षभरात भारताला कधीही कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून कोणत्या खेळाडूला खेळवण्याची वेळ आली नव्हती. पण शुक्रवारी जडेजा चक्कर येत असल्याची तक्रार करत असल्याने चहलला कन्कशन सब्सटिट्यूट म्हणून संघात सामील करण्यात आले. त्यामुळे चहल हा भारताचा पहिला कन्कशन सब्सटिट्यूट खेळाडू ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् अशी सुरु झाली शिखर धवनची लव्हस्टोरी
ट्रेंडिंग लेख –
पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगीरी
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी