भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. इंग्लंडमधील साउथँपटन येथे हा सामना रंगणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. शुक्रवारी (७ मे) बीसीसीआयने या दौऱ्यासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच ४ राखीव खेळाडूंनाही या दौऱ्याचे तिकीट मिळाले आहे. परंतु बीसीसीआयच्या एका नियमामुळे इंग्लंडला रवाना होण्यापुर्वीच क्रिकेटपटूंना घरचा रस्ता धरावा लागू शकतो.
…तर मुंबईतूनच जावे लागू शकते घरी
माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांना निर्देश दिले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी १९ मे रोजी मुंबईत सर्व खेळाडू एकत्र जमणार आहेत. तिथे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. यावेळी कोणीही कोरोना पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीला तिथूनच घरी पाठवले जाईल.
भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडसाठी उड्डाण भरण्याआधी भारतात ८ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना बबल टू बबल इंग्लंडच्या जैव सुरक्षित वातावरणात सहभागी केले जाईल. इंग्लंडला गेल्यानंतर खेळाडूंना तिथेही १० दिवसांच्या क्वारंटाईनमधून जावे लागणार आहे. दरम्यान खेळाडूंची ठराविक कालावधीने कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना सराव करण्याचीही मुभा देण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने यासंबंधी इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे की, “भारतीय संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना सूचित करण्यात आले आहे की, कोणीही मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या खेळाडूला इंग्लंडला नेण्यात येणार नाही. कारण बीसीसीआय कोणत्याही खेळाडूसाठी चार्टर्ड विमानाची सोय करणार नाही.”
“तसेच इंग्लंडला जाण्यापुर्वी खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई सोडण्यापुर्वी सर्वांचे २ कोरोना अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. जर असे नाही झाले तर, तर त्या खेळाडूला किंवा स्टाफ सदस्याला दौऱ्यावर घेऊन जाण्यात येणार नाही,” असेही त्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले आहे.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर