मुस्तफिजुर रहमानवरून (Mustfijur Rehman) सुरू झालेला वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या संघाला टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या वादावर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) बांगलादेशवर जोरदार टीका केली आहे.
एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, काही दिवसांतील घटनांमुळे बांगलादेशचा संघ भारतात येऊ इच्छित नाही. बांगलादेशात जे काही घडत आहे ते चुकीचे आहे. त्यांच्या मागणीवर आयसीसीने (ICC) काय तो निर्णय घ्यावा. आम्ही भारतात सर्वांचे स्वागतच करतो, पण त्यांना येथे यायचे आहे की नाही, हा त्यांचा निर्णय असेल.
या वादाची ठिणगी आयपीएल (IPL 2026) च्या लिलावात पडली असून, कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांमुळे, मुस्तफिजुरला संघात घेतल्याबद्दल KKR वर जोरदार टीका झाली. सोशल मीडियावर ‘अँटी नॅशनल’ असे शब्दही वापरले गेले. वाढता वाद पाहून बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुरला रिलीज करण्याचे (संघातून काढून टाकण्याचे) आदेश दिले.
मुस्तफिजुरला संघातून काढल्यामुळे संतापलेल्या बांगलादेश सरकारने आपल्या क्रिकेट बोर्डाला संघ भारतात न पाठवण्याचे आदेश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीचा विचार करूनच मुस्तफिजुरला रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला लवकरच त्याचा बदली खेळाडू (Replacement) उपलब्ध करून दिला जाईल. आता बांगलादेशचे सामने भारतात होणार की दुसऱ्या देशात हलवले जाणार, याचा अंतिम निर्णय ICC ला घ्यावा लागणार आहे.






