भारताचा कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी चँपियनशीप २०२२ मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत तो ससेक्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असून त्याने या संघाकडून पदार्पण करताना दमदार दुहेरी शतक ठोकले होते. परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. तो सामना अनिर्णीत राहिला होता. यानंतर आता दुसऱ्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली, परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
वॉर्सेस्टशायर विरुद्ध ससेक्स (Worcestershire vs Sussex) यांच्यात २१-२३ एप्रिलदरम्यान खेळला गेलेला सामना वॉर्सेस्टशायरने १ डाव आणि ३४ धावांनी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वॉर्सेस्टशायर संघाने ४९१ धावा केल्या होत्या. त्यांच्या ४९२ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ससेक्सला पहिल्या डावात ८१.५ षटकांमध्ये २६९ धावाच करता आल्या. पुढे फॉलोऑनमध्येही ६३ षटके खेळताना ससेक्सचा दुसरा डावही १८८ धावांवरच गडगडला. परिणामी ससेक्सला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
चेतेश्वर पुजाराचे शानदार शतक
मात्र पुजाराने (Cheteshwar Pujara) ससेक्सकडून चिवट झुंज दिली. वॉर्सेस्टशायरच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या डावात ससेक्सकडून पुजाराने धुव्वादार शतकी खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना पुजाराने दुसरी बाजू धरून ठेवली. त्याने २०६ चेंडूंचा सामना करताना १०९ धावा (Cheteshwar Pujara Century) फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकारही मारले.
मात्र त्याला त्याच्या इतर संघ सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. त्याच्याव्यतिरिक्त ससेक्सकडून एकाही फलंदाजाला साधे अर्धशतकही करता आले नाही. त्याच्याखेरीज टॉम क्लार्कने ४४ धावा केल्या. इतर फलंदाज ३० धावाही करू शकले नाहीत. त्यानंतर वॉर्सेस्टशायरने फॉलोऑन दिल्यावर दुसऱ्या डावात पुजारालाही विशेष योगदान देता आले नाही. तो केवळ १२ धावांवर बाद झाला.
A disappointing defeat today. 🏏
The match report and reaction from Ian Salisbury is now online. ⬇ #GOSBTS
— Sussex Cricket (@SussexCCC) April 23, 2022
पदार्पणात पुजाराची द्विशतकी खेळी
तत्पूर्वी डर्बीशायरविरुद्ध पहिल्या डावात केवळ ६ धावा केलेला पुजारा दुसऱ्या डावात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने नाबाद २०१ धावांची खेळी केली होती. पुजाराच्या बॅटमधून तब्बल २७ महिन्यांनंतर हे शतक आले होते. त्याने अखेरच्या वेळी २०२० रणजी ट्रॉफी सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध शतक साजरे केले होते. तर त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आले होते.
खराब फॉर्ममूळे पुजाराला भारतीय संघातील आपली जागा गमवावी लागली आहे. तो या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सहा सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याची गाडी काही थांबेना! हंगामातील सलग तिसऱ्या अर्धशतकामुळे ‘या’ यादीत ठरला ‘टॉपर’