नुकताच टी२० विश्वचषकाचा थरार संपला असून येत्या काही दिवसांमध्ये मानाची ऍशेस मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट विवादामध्ये अडकले असून टीम पेन यासाठी जबाबदार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने ऍशेस मालिका तोंडावर आली असताना तडकाफडकी नेतृत्त्वपद सोडले आहे. ४ वर्षांपूर्वीच्या एका लाजिरवाण्या प्रकरणात आपले नाव आल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.
परंतु आपल्या या निर्णयानंतर त्याला खेळाडू म्हणून ऍशेस मालिकेत खेळायचे आहे. मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे टिम पेनपुढील अडचणी वाढल्या असल्याचे दिसत आहे.
शनिवारी (२० नोव्हेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मान्य केले आहे की, टिम पेनने हे प्रकरण माध्यमांपासून लपवणे ही त्याची सर्वात मोठी चूक होती. माध्यमांशी या विषयासंदर्भात बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष रिचर्ड फ्रॉइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की, “मी वर्ष २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयाविषयी आता काही बोलू शकत नाही. परंतु जर तथ्यांनुसार आज हे प्रकरण सर्वांपुढे येत असेल तर आम्ही तो निर्णय कधीच घेतला नसता. त्या निर्णयामुळे सर्वत्र चुकीचा संदेश गेला आहे.”
“ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराचे चारित्र्य पवित्र असायला हवे आणि त्याचा दर्जाची सर्वोच्च असायला हवा. खरे तर टिम पेनला त्यावेळीच नेतृत्त्वपदावरुन काढून टाकायला पाहिजे होते,” असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता टिम पेनला कसोटी संघात जागाही मिळणे अशक्य असल्याचे दिसते आहे.
काय आहे ते लाजिरवाणे प्रकरण?
साल २०१७ मध्ये टास्मानिया क्रिकेटमधील एका महिला कर्मचारीला अश्लील फोटो आणि मेसेज केल्याचा आरोप टिम पेनवर झाला आहे. आता त्याने त्या प्रकरणाबाबत सर्वांची माफी मागत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये झालेल्या या प्रकरणी टास्मानिया क्रिकेट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टिम पेनला क्लीन चिट दिली होती. तपासानुसार, ही टीम पेनची वैयक्तिक बाब होती आणि त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झालेले नव्हते. परंतु आता ते प्रकरण जास्तच चिघळल्याने टिम पेनची कारकिर्द धोक्यात आल्याचे दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्ध अलीने केली २१९ किमी प्रति ताशी वेगाने गोलंदाजी? सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ
‘ज्यांना संधी मिळालेली नाही, त्यांचीही वेळ येणार’, युवा खेळाडूंना खेळवण्याबाबत रोहित शर्माचे भाष्य
बॅटही तुटली अन् पुढच्या चेंडूवर विकेटही गेली! भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर ‘असा’ झाला निशम आऊट