वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आज अखेर आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी हा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली.
मात्र आता हा हंगाम रद्द झाल्याने विदेशी खेळाडूंची अडचण निर्माण झाली आहे. यातील विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यात अडचणी येत आहेत. कारण ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. याबाबत आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्तपणे एक निवेदन जाहीर केलं आहे.
“सरकारचे नियम मोडणार नाही”
ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांना देखील या नियमामुळे मायदेशी परतण्याची मुभा नाही. मात्र आता आयपीएल रद्द झाल्यावर हा नियम शिथिल करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र या नियमात काहीही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या हितासाठी नियम वाकवणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र “आम्ही नियमाचे उल्लंघन करणार नाही”, असे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनात ते म्हणतात, “खेळाडूंच्या आणि सहभागी व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयच्या संपर्कात असून आम्ही सर्व खेळाडू तसेच समालोचक आणि इतर सहभागी व्यक्ती यांना सुखरूप परत आणण्याच्या पर्यायांचा विचार करतो आहोत. ऑस्ट्रेलियन सरकारच्या भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर १५ मेपर्यंत बंदी घालण्याच्या निर्णयाचाही आम्ही आदर करतो. या नियमात आम्ही कुठलीही सवलत मागणार नाही.”
त्यामुळे आता आयपीएलमध्ये सहभागी असलेले खेळाडू, समालोचक, पंच आणि इतर व्यक्ती मायदेशी कसे परतणार याबाबत संदिग्धताच आहे. याबाबत आता कुठला पर्याय अमलात आणला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल तर रद्द झालीय, आता परत कधी आपण भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना पाहणार? जाणून घ्या थोडक्यात
बीसीसीआयने आयपीएल २०२१चा हंगाम तुर्तास केला रद्द, जाणून घ्या उर्वरित सामने केव्हा आणि कुठे होणार?






