विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वात जास्त धावा कोण करणार? तसेच सर्वाधिक बळी कोण टिपणार? यासंदर्भात जगभरातले क्रिकेटपटू आणि क्रिकेट जाणकार वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अशातच मुंबईकर प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय गोलंदाजीचे संयोजन कसे असावे याबद्दल माहिती दिली.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्लेईंग ११ मध्ये इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला खेळवणे या मतांशी शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सहमत नाहीत. लाड यांचे म्हणणे आहे की, “भारतीय संघ जर तीन वेगवान गोलंदाजांसोबत उतरतो तर, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संधी मिळायला हवी. जर भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाज खेळतो तर शार्दुल ठाकूरचा पर्याय चांगला आहे.”
काही दिवसांपुर्वी हरभजन सिंगने सांगितले होते, “जर मी कर्णधार असतो तर, मी तीन वेगवान गोलंदाज खेळवले असते. त्यामध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना खेळवले असते.”
यावर लाड सांगतात की, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रयोग करणे, भारतीय संघाला महाग पडू शकते. भारतीय संघाने अनुभवी गोलंदाजांसोबतच खेळावे. तसेच साउथैम्पटनच्या खेळपट्टीचा अंदाज ईशांत आणि शमीला आहेच. जर तुम्ही त्यांना तिकडे घेऊन गेला आहात तर त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे.”
लाड पुढे सांगतात, “माझ्या हिशोबाने भारतीय संघाने ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळले पाहिजे. शमी, बुमराह आणि ईशांतसोबत शार्दुलला संघात घेतले पहिजे. सोबत ५वा गोलंदाज म्हणून जडेजा किंवा अश्विन यांना संधी दिली पाहिजे. इंग्लंडला जाण्यापूर्वी मी शार्दुल ठाकूर सोबत बोललो होतो. मी त्याच्यासोबत त्याच्या खेळाबद्दल जास्त काही बोललो नाही. परंतु, त्याला सांगितले की, संधी मिळाली तर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतनी कमाल कर.”
ठाकूर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि येत्या काळात तो भारतीय संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू ठरणार. रोहित सुद्धा आता कसोटीत आपले स्थान पक्के करून बसला आहे. भारतात झालेल्या सर्व सामन्यात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि अपेक्षा आहे रोहित सुद्धा चांगली खेळी करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय वंशाच्या ‘या’ क्रिकेटपटूंचा पाकिस्तान सुपर लीगमध्ये बोलबाला, रहस्यमयी गोलंदाजाचाही समावेश
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, पण का? इमाम-उल-हक यांनी सांगितले कारण