क्रिकेटचे जनक म्हणजे इंग्लंड. एके काळी अर्ध्या पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. साहजिकच जिकडे त्यांचे राज्य, तिकडे त्यांचे खेळ. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंडिज बेटांवर क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार झाला तो इंग्लंड मुळेच. त्यांनी सुरुवातीला काही दौरे अमेरिकन बेटांवर केले मात्र ते प्रकरण काही जमलं नाही. एका वसाहतीने मात्र त्यांचा हा खेळ खूप चांगलाच आत्मसात केला, ती वसाहत म्हणजे ऑस्ट्रेलिया.
ऑस्ट्रेलियाने आपला खेळ बराच उंचावला, त्यांचे मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड हे प्रेक्षकांच्या बाबतीत लॉर्ड्सच्या ही पुढे होते. खरंतर इंग्लंडसाठी ऑस्ट्रेलिया म्हणजे बरंच दूर, एक एक महिना बोटीचा प्रवास करून खेळायला जायचं म्हणजे धाडसचं होते. पण इंग्लंडने हळू हळू का होईना नियमित दौरे करायला सुरुवात केली. १८७७ला मेलबर्नला झालेल्या सामन्याला कसोटी सामन्याचा दर्जा दिला गेला आणि टेस्ट क्रिकेट जन्माला आले.
त्यानंतर आळीपाळीने इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकमेकांशी कसोटी सामने खेळू लागले. असाच एक सामना खेळवला गेला ओव्हलच्या मैदानावर, तारीख होती २८ ऑगस्ट १८८२. इंग्लंडचे पावसाळी हवामान आणि त्याकाळच्या न झाकलेल्या विकेट्स त्यामुळे जास्त धावा होणार नाहीत हे गृहीतच होते. पहिल्याच दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया ६३ आणि इंग्लंड १०१ धावांवर सर्वबाद झाले. दोन डाव संपले.
दुसऱ्या दिवशी मात्र ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. उत्तम फटकेबाजी करत हयुग मॅस्सी याने केवळ ६० चेंडूत ५५ धावा केल्या. तो पिचवर असेपर्यंत इंग्लंडच्या जीवात जीव नव्हता, कारण एकेक रन त्यांचा विजय अजून दूर करत होता. मात्र मॅस्सी ५५ वर बाद झाला आणि इंग्लंडने उरलेले बळी पुढच्या केवळ ५६ धावात घेतले. विजयासाठी इंग्लंडला केवळ ८५ धावा हव्या होत्या.
डब्ल्यू.जी.ग्रेस सारखा फलंदाज संघात असताना ८५ धावा इंग्लंडसाठी जास्त नव्हत्या. त्याकाळी ऑस्ट्रेलियाचा सर्वात भेदक गोलंदाज होता तो म्हणजे ‘फ्रेड स्पॉफ्फोर्थ’, त्याचे टोपणनाव होतं ‘राक्षस’ (Demon). ग्रेस असेपर्यंत इंग्लंडचा विजय दूर नव्हता. मात्र इंग्लंडने ग्रेसचा बळी ५१/३ असताना गमावला आणि स्पॉफ्फोर्थ या राक्षसाने अक्षरशः थैमान घातले. ६६/४ वरून त्याने इंग्लंडची अवस्था ७७ सर्वबाद केली. स्पॉफ्फोर्थने केवळ ४४ धावा देऊन ७ बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाने एक महान विजय नोंदवला.
इतक्या अपमानकारक पराभवानंतर इंग्लंड संघावर यथेच्च टीका झाली. स्वतःच्याच जमिनीवर स्वतःच्याच वसाहतीकडून पराभव स्वीकारणे हे लज्जास्पद होते. ‘द स्पोर्टींग टाइम्स’ या वृत्तपत्राने तर इंग्लिश क्रिकेटची श्रद्धांजली छापली. “आज ओव्हल येथे इंग्लिश क्रिकेटचा मृत्यू झाला असून सर्व जवळच्या लोकांना त्याचे अतीव दुःख आहे. देहाचे दहन करून ‘ऍशेस’ (राख) ऑस्ट्रेलियाला नेली जाईल” ह्या ओळी निदान पुढची १३० वर्ष लोकांच्या आठवणीत आहेत.
One day to go… #Ashes pic.twitter.com/8vKyrRJkFx
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2017
नंतर १८८३ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३ कसोटी सामन्यांसाठी दौरा केला. यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा दोन सामन्यात पराभव केला. त्यावेळच्या इंग्लिश कर्णधार इवो ब्ली याने नमूद केलंय कि काही ऑस्ट्रेलियन महिलांनी एक बेल (Bail) जाळून त्याची राख एका छोट्या चषकात अर्पण केली. ह्याच त्या ‘ऍशेस’.
अर्थात ‘ऍशेस’ ची संकल्पना लोकप्रिय व्हायला थोडा वेळ लागला. २० वर्षांनंतर पेल्हम वॉर्नर याने ऑस्ट्रेलिया दौरा करण्याआधी ‘आम्ही ऍशेस जरूर परत आणू’ असं म्हटलं. ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याचे हे वाक्य उचलून धरलं आणि ‘ऍशेस’ खऱ्या अर्थाने सुरु झाली.
अर्थात जो छोटा चषक आपण नेहमी ऍशेस मध्ये बघतो तो खरा चषक नसून केवळ त्याची प्रतिकृती आहे. खरा ऍशेसचा चषक MCCच्या लॉर्ड्सवरील क्रिकेट संग्रहालयात ठेवलेला आहे. आजही दर मालिका विजयानंतर त्याची प्रतिकृती विजयी संघाला दिली जाते.
It's exactly 24 hours until the first ball of the 2017/18 #Ashes!
Come on England! 🏴 pic.twitter.com/27xCNBFoAU
— England Cricket (@englandcricket) November 22, 2017
जवळपास दोन वर्षाच्या अंतराने आलटून पालटून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध ही ऐतिहासिक मालिका खेळतात. जगभरच्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी असते आणि दोन्ही संघ जीव तोडून ‘ऍशेस’ जिंकण्याचा प्रयत्न करतात. अशाच संघर्षांमधून १९३२ची बॉडीलाईन आणि २००५ची मालिका जी आजपर्यंतची सर्वोत्तम कसोटी मालिका म्हणून ओळखली जाते ती खेळली गेली.
२३ नोव्हेंबर पासून ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा ऍशेसचा थरार चालू होईल. तो बघायला सकाळी ५ वाजता उठणार ना?
-ओंकार मानकामे