कोरोना विषाणूच्या साथीमुळे इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा यावर्षी युएईमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत जवळपास निम्मे सामने खेळले गेले असून आतापर्यंतचे निकाल आश्चर्यचकित करणारे आहेत. केवळ दोन सामने जिंकून तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेमध्ये सातव्या स्थानावर आहे. चाहत्यांना सीएसके आणि धोनीकडून अशी अपेक्षा नव्हती. यावर्षी लीगमध्ये अनुभवी खेळाडू फ्लॉप असल्याचे सिद्ध होत असताना दुसरीकडे युवा खेळाडू आपल्या कामगिरीने चाहत्यांची मने जिंकत आहेत.
या स्पर्धेपूर्वी अनेक मोठ्या नावांची चर्चा होती, ज्यांच्याकडून यावर्षी चांगली कामगिरी अपेक्षित होती. त्यात सुनील नरेन, आंद्रे रसेल, एमएस धोनी, केदार जाधव, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, उमेश यादव, रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव यांचा समावेश आहे. आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांनुसार फ्लॉप ठरलेल्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
आंद्रे रसेल
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा एक दिग्गज खेळाडू आहे, ज्याच्याकडे एकहाती सामने जिंकण्याची ताकद आहे. रसेलने आयपीएलच्या मागील हंगामांमध्ये अनेकदा हे सिद्ध केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्या रसेलने आयपीएल २०२० मध्ये ७ सामन्यांत ११.८३ च्या सरासरीने अवघ्या ७१ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीतही तो यशस्वी होऊ शकलेला नाही. त्याने आतापर्यंत फक्त ६ विकेट्स घेतल्या आहेत. शेवटच्या ५ षटकांत ५०-६० धावा करणारा तो खेळाडू आहे. परंतु या आयपीएलमध्ये त्याची बॅट आतापर्यंत शांत आहे. आयपीएल २०१९ मध्ये रसेलने ५१० धावा केल्या आणि ११ विकेट्स घेतल्या होत्या.
ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या लिलावात २०२० मध्ये १०.७५ कोटी रुपयांना संघात सामील केले. २०१४ मध्ये जेव्हा युएईमध्ये आयपीएल खेळला गेला, तेव्हा मॅक्सवेलच्या बॅटने धावांचा जोरदार पाऊस पाडला होता. २०१४ च्या आयपीएलमध्ये त्याने केवळ १६ सामन्यांत ५५२ धावा केल्या होत्या. तर त्यात त्याने चार अर्धशतकेही झळकावली होती. यानंतर २०१५ मध्ये मॅक्सवेलने ११ सामन्यांत १४५ धावा आणि २०१६ मध्ये १७९ धावा केल्या. यानंतर, २०१७ मध्ये त्याने पंजाबकडून १४ सामन्यांत ३१० धावा केल्या. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये प्रवेश केला आणि १२ सामन्यांत १६९ धावा केल्या. आयपीएल २०१९ मध्ये त्याने विश्वचषकामुळे भाग घेतला नव्हता.
पण या २०२० च्या स्पर्धेत त्याने शानदार खेळ दाखवावा अशी अपेक्षा होती. गेल्या वर्षी त्याने बिग बॅश लीगमध्ये १६ डावांमध्ये १४८.५१ च्या स्ट्राईक रेटने ३९८ धावा केल्या होत्या. या व्यतिरिक्त त्याने गोलंदाजीत १६ गडी देखील बाद केले होते. पण आयपीएल २०२० मध्ये त्याची कामगिरी आतापर्यंत अत्यंत वाईट झाली आहे. त्याने ७ सामन्यात ९५.०८ च्या स्ट्राइक रेटने फक्त ५८ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत फक्त एक विकेट घेतली आहे.
पॅट कमिन्स
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आयपीएल २०२० च्या लिलावात सर्वाधिक विकला गेलेला परदेशी खेळाडू होता. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १५.५० कोटी रुपयांना खरेदी केली. आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वात मोठी बोली होती. कमिन्सने यापूर्वी आयपीएलच्या केवळ तीन सत्रात भाग घेतला होता. यात त्याने १६ सामन्यात १७ गडी बाद केले. त्याने शेवटचा आयपीएल २०१७ मध्ये खेळला होता. त्यात त्याने १२ सामन्यात १५ बळी घेतले होते.
यावर्षी त्याच्याकडून बरीच अपेक्षा होती कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलियाकडून सातत्याने चांगली कामगिरी करत होता. पण आयपीएल २०२० मध्ये तो आतापर्यंत फ्लॉप ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात त्याने फक्त दोन विकेट घेतल्या आहेत.
एमएस धोनी
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी यावेळी फॉर्ममध्ये दिसत नाही. वयाचा परिणाम त्याच्या खेळावरही स्पष्टपणे दिसतो आहे. अखेरच्या षटकात आपल्या संघाला विजय मिळवून देणारा धोनी या वेळी फ्लॉप ठरल्याचे सिद्ध होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने आतापर्यंत ७ सामन्यांत ३७.३३ च्या सरासरीने आणि १३१.७६ च्या स्ट्राईक रेटने ११२ धावा केल्या आहेत. यावेळी त्याच्या फलंदाजीमधून केवळ ७ चौकार आणि ५ षटकार बाहेर आले आहेत. याचा परिणाम त्याच्या संघाला देखील झाला आहे. त्यामुळे या स्पर्धेत चेन्नई संघ सातव्या क्रमांकावर आहे.
केदार जाधव
चेन्नई सुपर किंग्जच्या स्टार फलंदाजांपैकी एक असलेला केदार जाधव आयपीएल २०२० मध्ये पूर्ण फ्लॉप असल्याचेही सिद्ध होत आहे. ज्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही होत आहे. त्याला ६ सामन्यात १९.३३ च्या सरासरीने ५८ धावा करता आल्या आहेत. या हंगामापूर्वी जाधव सीएसकेकडून खेळताना बऱ्याचदा मॅच विनर खेळाडू ठरला होता. ३४ वर्षीय जाधवने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १२ चेंडू खेळले आणि अवघ्या ७ धावा केल्या. त्याच्या धीम्या फलंदाजीमुळे अखेर संघ १० धावांनी १६८ धावांच्या पाठलाग करण्यास अपयशी ठरला. जाधव फलंदाजीला आला तेव्हा संघाला ४० पेक्षा जास्त धावांची गरज होती. यावेळी त्याने पहिल्या ५ चेंडूत फक्त एक धावा घेतली. त्याच्या संथ फलंदाजीवर सर्वत्र टीका होत आहे.
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
महत्त्वाच्या बातम्या-
-“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
-गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
-वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा