भारतात होणारी इंडियन प्रीमीयर लीग ही जगातील सर्वात मोठी टी२० स्पर्धा असल्याचं मानलं जातं. यात एकूण ८ संघांचा समावेश असतो. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा समावेश आहे.
संघांचे मालक खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च करतात. ही स्पर्धा केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप पसंत केली जाते. परदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभागी होतात.
याच आयपीएलमध्ये असे काही खेळाडू आहेत जे ज्या संघासाठी खेळले, नंतर ते त्याच संघाचे प्रशिक्षक बनले. होय, तुम्हाला असं वाटेल की, हे काय ज्या शाळेत मुलं शिकली त्या शाळेचेच मुख्याध्यापक झाले? परंतु हे खरे आहे.
५ असे खेळाडू जे आयपीएल मध्ये खेळले, नंतर त्याच संघाचे प्रशिक्षक बनले..
१. डेनियल व्हिटोरी (Daniel Vettori)
न्यूझीलंडचा माजी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरी याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल तुम्हाला सर्व माहितीच असेल. परंतु व्हिटोरी अशा खेळाडूंच्या यादीत सामील आहेत, ज्यांनी ज्या संघातर्फे आयपीएल खेळले त्याच संघाचे प्रशिक्षक झाले.
माजी फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरीने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता Delhi Capitals) पासून केली. पहिल्या तीन सत्रात दिल्ली संघात आणि चौथ्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले.
साल २०११ आणि २०१२ मध्ये आरसीबीसाठी खेळल्यानंतर ते २०१४ मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. तथापि, प्रशिक्षक आणि खेळाडू बदलत असणाऱ्या आरसीबी संघाचे भवितव्य एकाही हंगामात बदलू शकले नाही आणि आजपर्यंत या संघाने एकही आयपीएल चषक जिंकला नाही.
प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांच्या नेतृत्वात संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. ते साल २०१८ पर्यंत संघाचे प्रशिक्षक राहिले आणि त्यांची टीम ५ वर्षांत एकदाच अंतिम फेरी गाठू शकली.
आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात हैदराबादविरुद्ध पराभूत होऊन आरसीबी संघ उपविजेता ठरला होता. आयपीएल २०१७ आणि २०१८ मध्ये संघाला प्ले ऑफमध्येही स्थान मिळविण्यात अपयश आले. यानंतर संघ मालकांनी त्यांना प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
२. स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming)
आयपीएलचा दुसरा यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज. या संघाने ३ वेळा आयपीएल चषक आपल्या नावे केला आहे. या संघाचा एक खेळाडू होता जो दुसर्याच वर्षी त्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाला.
न्यूझीलंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीतील स्टीफन फ्लेमिंगबद्दल बोलत आहोत. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २००८ मध्ये त्याला संघात समावेश करून घेतलं. त्यावर्षी त्याने १० सामन्यात २१ च्या सरासरीने आणि ११८ च्या स्ट्राइक रेटने १९६ धावा केल्या.
फ्लेमिंगच्या प्रशिक्षणामध्ये चेन्नईने ३ वेळा आयपीएल चषकावर आपलं नाव कोरल आहे. जेव्हा चेन्नई सुपर किंग्जवर बंदी होती, तेव्हा फ्लेमिंग याने राईझिंग पुणे सुपरजायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दोन वर्षे काम पाहिले.
चेन्नईने आतापर्यंत ११ हंगाम खेळले असून त्यातील १० वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. फ्लेमिंगचे महेंद्रसिंग धोनीशी खूप चांगले संबंध आहेत आणि या कारणास्तव तो अजूनही संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर कायम आहे.
३. राहुल द्रविड़ (Rahul Dravid)
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू “द ऑल” राहुल द्रविड हा देखील संघामध्ये खेळल्यानंतर प्रशिक्षक ठरलेल्या खेळाडूंच्या यादीत आहे. द्रविडने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मधून केली. आरसीबीमध्ये ३ हंगाम राहिल्यानंतर २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात सामील केले.
साल २०१३ नंतर द्रविड याला राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक बनविण्यात आले. त्याच्या संघाने आयपीएल २०१४ मध्ये चांगली सुरुवात केली होती. पण शेवटच्या काही सामन्यांत खराब कामगिरीमुळे संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. जर तुम्हाला आठवत असेल तर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर राहुल द्रविडचा राग पाहण्यासारखा होता.
या हंगामानंतरच द्रविडने राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पद सोडले आणि तो दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला. त्याचबरोबर सध्या द्रविड एनसीएचा (National Cricket Academy) प्रमुख आहे.
४. शॉन पोलॉक (Shaun Pollock)
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली. आयपीएल २००८ च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. एस. श्रीशांतला थप्पड मारल्या प्रकरणी हरभजन सिंगला बंदी घातल्यानंतर पोलॉकने काही सामन्यांमध्ये मुंबईची कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्या मोसमात (२००८) त्याने १३ सामन्यांत ११ गडी बाद केले आणि त्याच वर्षी त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली.
या वेगवान गोलंदाजाची मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली. २००९ ते २०१३ पर्यंत तो संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. खरंतर, मुंबई संघाने २०१३ मध्येच प्रथम आयपीएल चषक जिंकला होता.
साल २०१३ मध्येच पोलॉकचे प्रशिक्षणाने मन भरलं आणि तो मुंबई इंडियन्समधून बाहेर पडला. आता तो समालोचन करताना दिसतो.
५. ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum)
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने संपूर्ण जगाचे लक्ष इंडियन प्रीमियर लीगकडे आकर्षित केले. या खेळाडूने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सकडून केली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद १५८ धावांची तुफानी खेळी केली. तो विक्रम नंतर २०१३ मध्ये क्रिस गेलने नाबाद १७५ धाव करून मोडीत काढला.
टी२० क्रिकेटमधील त्यावेळची ही सर्वात मोठी खेळी होती. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व्यतिरिक्त तो केकेआर, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स केरळ या संघातही मॅक्यूलम खेळला आहे.
साल २०१९ मध्ये त्याने ग्लोबल कॅनडा लीगमध्ये खेळल्यानंतर क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर लगेच कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपला मुख्य प्रशिक्षक बनवले.
या खेळाडूच्या, आयपीएलच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएलमध्ये एकूण १०९ सामने खेळले आहेत आणि १३१.७५ च्या स्ट्राईक रेटने २८८० धावा केल्या आहेत.
केकेआरने आत्तापर्यंत २ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. परंतु केकेआरने २०१४ नंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ४ भारतीयांचा आहे समावेश
कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज
“मैदानातील कट्टर वैरी असलो तरी…”, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सचिन तेंडुलकरसाठी ‘या’ दिग्गजाचा संदेश