पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टी20 आणि कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा जैव सुरक्षित वातावरणात पार पडणार आहे. मात्र असे असतानाच पाकिस्तानच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची मालिका सुरूच आहे.
मंगळवारी (30 नोव्हेंबर) पाकिस्तानच्या 3 खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासह पाकिस्तान संघातील एकूण कोरोना संक्रमित खेळाडूंची संख्या 10 वर गेली आहे. संघ सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. न्यूझीलंडचे आरोग्य मंत्रालय या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहे. संघातील वाढत्या कोरोना प्रकरणाची संख्या लक्षात घेता याआधीच संघाच्या सरावावर बंदी घालण्यात आली होती.
न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याच्या सहाव्या दिवशी पाकिस्तान संघातील 46 सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्या सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल याआधी निगेटिव्ह आला होता, त्यातील 3 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इतर कोणत्याही खेळाडूला याचा धोका उद्भवणार नाही, हे सुनिश्चित केल्याशिवाय पाकिस्तान संघ प्रशिक्षण घेऊ शकणार नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 18 डिसेंबरपासून 3 टी20 सामन्यांची मालिका सुरू होईल. यानंतर या दोन्ही संघात दोन कसोटी सामने खेळले जातील.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, पाकिस्तानचे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर आल्यानंतर जेव्हा क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले होते, तेव्हा न्यूझीलंड सरकारने पाकिस्तान संघाला परत पाठविण्याचा शेवटचा इशारा दिला होता.
अलीकडेच शनिवारी (28 नोव्हेंबर) न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, “जेव्हापासून पाकिस्तान संघाचा इशारा देण्यात आला आहे, तेव्हापासून त्यांच्यात सुधारणा झाली आहे आणि ते क्वारंटाईन नियमांचे पालन करत आहेत.” पण आता पाकिस्तान संघातील कोरोना संक्रमित सदस्यांची वाढ होताना पाहून न्यूझीलंड काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितच्या निवडीवरून झालेल्या वादात भारतीय दिग्गजाची उडी, विराटचे केले समर्थन
नेटमध्ये सराव करताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त; धाडलं भारतात
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी