भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने चांगल्या प्रकारे पुनरागमन केले आहे. शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने भारतीय संघाला सर्वबाद केले आणि त्यांच्या पहिल्या डावाची उत्कृष्ट सुरुवात केली. भारतीय संघ १११.१ षटकात ३४५ धावा करून सर्वबाद झाला. भारताचा उमेश यादव हा एकमेव खेळाडू नाबाद राहीला. उमेशने डावाच्या अंतिम क्षणांमध्ये एक जबरदस्त षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
उमेश यादव भारतीय संघासाठी खालच्या फळीत फलंदाजी करतो, त्यामुळे त्याला अनेकदा खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र, या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा योग आला आणि त्याने याचा योग्य फायदा घेतला. उमेशने पहिल्या डावात ३४ चेंडूत १० धावा केल्या आणि नाबाद राहिला. यादरम्यान त्याने जागेवर उभा राहून एक मोठा षटकार मारला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्याचे कौतुकही करत आहेत.
https://twitter.com/RISHItweets123/status/1464125486464847875?s=20
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. यामध्ये भारतासाठी या सामन्यात पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने (१०५) शतकी खेळी केली. दुपारच्या जेवणापूर्वी भारताची धावसंख्या ८ बाद ३३९ धावा होती. दुसऱ्या सत्रात भारतीय संघ या धावसंख्येत फक्त सहा धावांची भर टाकू शकला. न्यूझीलंडसाठी पहिल्या डावात टिम साउदीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तसेच काइल जेमिसनने तीन आणि एजाज पटेलने दोन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने त्यांच्या पहिल्या डावाची चांगली सुरुवात केली आहे. न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम (५०) आणि विल यंग (७५) यांनी शतकी भागेदारी पूर्ण केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड एकही विकेट न गमावता १२९ धावांचा टप्पा गाठला आहे. भारत अजून २१६ धावांनी आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
भर सामन्यात अश्विनकडून घडली चूक, संतापलेल्या साउदीची थेट पंचांकडे तक्रार; पाहा घडलेला प्रकार
लय भारी! ज्याने आपली जागा घेत कानपूर कसोटीत शतक ठोकले, त्याचीच विराटने थोपटली पाठ