रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर संघाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितलं की, ज्या पद्धतीची खेळपट्टी होती आणि आमची जशी सुरूवात झाली, त्यानुसार आम्ही 200 धावा काढणं आवश्यक होतं.
आयपीएल 2024 मध्ये शनिवारी (6 एप्रिल) रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 गडी राखून जबरदस्त विजय मिळवला. आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 3 विकेट्स गमावून 20 षटकांत 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं अगदी सहजरित्या अवघ्या 19.1 षटकांत लक्ष्य गाठलं. या सामन्यादरम्यान कोहली आणि फाफ डू प्लेसीसमध्ये पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागिदारी झाली होती, परंतु तरीही आरसीबीला 200 धावांचा टप्पा गाठता आला नाही.
सामना संपल्यानंतर अँडी फ्लॉवरनं सांगितलं की, “आम्ही धावा कमी केल्या होत्या. आम्हाला ज्या पद्धतीची सुरुवात मिळाली होती, ते पाहता या (183) धावा कमी होत्या. आम्ही 12 षटकांत कोणतीही विकेट न गमवता 107 धावा केल्या होत्या. चांगली खेळपट्टी असून आणि चांगली सुरुवात मिळूनही आम्ही 200 धावाही करू शकलो नाही. तसेच आम्ही गोलंदाजीतही सुरुवात चांगली केली होती. यश दयाल आणि रीस टॉप्ली यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकांत ज्याप्रकारे धावा गेल्या, सामना तिथेच फिरला, आणि आम्हाला सामन्यात पुनरागमन करता आलं नाही.”
आयपीएल 2024 मध्ये आरसीबीनं आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यापैकी 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला असून, संघानं पंजाब विरुद्धचा एकच सामना जिंकला आहे. आता स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये आरसीबीला विजय मिळवावा लागेल, नाही तर बाद फेरीमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग अवघड होईल. आरसीबीचा पुढील सामना 11 एप्रिलला मुंबई विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झालं गेलं गंगेला मिळालं! धोनी-गंभीरनं एकमेकांना मारली मिठी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
चेन्नई सुपर किंग्ज विजयी ट्रॅकवर परतली, कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव
रवींद्र जडेजाचा आयपीएलमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू