आयपीएल 2024 मधील 22वा सामना दोन माजी विजेत्या संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम आणि दुसऱ्या बाजूला दोन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स. सीएसकेचा संघ हा घरच्या मैदानावर खेळत होता. त्यांनी येथे आपला दबदबा कायम ठेवत केकेआरला 7 विकेट्सनं पराभूत केलं. सीएसकेच्या विजयात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानं महत्त्वाची कामगिरी बजावली. या सामन्यात त्यानं सामनावीरचा पुरस्कारही पटकावला. हा पुरस्कार जिंकताच त्यानं चेन्नईचा दिग्गज खेळाडू एम एस धोनी याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.
रवींद्र जडेजानं एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं आपल्या चार षटकांत 18 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. जडेजानं आतापर्यंत आयपीएलमध्ये सीएसकेसाठी 177 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 15 वेळा सामनावीरचा पुरस्कार पटकावला आहे. एमएस धोनीनं देखील सीएसकेसाठी 249 सामन्यांमध्ये 15 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. अशाप्रकारे जड्डूनं आपल्या माजी कर्णधाराची बरोबरी केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू
15 – एमएस धोनी
15 – रवींद्र जडेजा
12 – सुरेश रैना
10 – ऋतुराज गायकवाड
10 – माइकल हसी
चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सामन्यात तुषार देशपांडेनं 3 विकेट्स, मुस्तफिजुर रहमान 2 विकेट्स आणि महेश तीक्ष्ना यानं 1 विकेट घेतली. यामुळे केकेआरचा संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकला नाही. प्रत्युत्तरात, सीएसकेनं अवघ्या 17.4 षटकांत सामना आपल्या खिशात टाकला. धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं महत्त्वाची कामगिरी केली. त्यानं 58 चेंडूत 9 चौकाराच्या मदतीनं 67 धावांची खेळी केली. डॅरिल मिचेलनं 25 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. तर शिवम दुबेनं 18 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या जोरावर 28 धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यात 5 बळी घेणारा पहिला गोलंदाज, जाणून घ्या कोण आहे विदर्भाचा यश ठाकूर?
एड शीरननं विचारलं, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”; शुबमन गिलनं दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!