अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतील 9वा सामना 20 जुलै रोजी चर्च स्टील पार्क येथे पार पडला. या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. हा सामना वॉशिंग्टन फ्रीडम संघाने 6 विकेट्सने जिंकला. मात्र, या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेल याला मिळाला. यामागील कारण त्याने सामन्यातील केलेले प्रदर्शन ठरले.
आंद्रे रसेलचे वादळ
वॉशिंग्टन फ्रीडम विरुद्ध लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Washington Freedom vs Los Angeles Knight Riders) सामन्यातील नाणेफेक वॉशिंग्टन संघाच्या पारड्यात पडली. यावेळी त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतल नाईट रायडर्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 175 धावा केल्या होत्या. यावेळी नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल (Andre Russell) याने वादळी फलंदाजी केली. संघाकडून सर्वाधिक धावा रसेलनेच केल्या. त्याने यादरम्यान 37 चेंडूत तडाखेबंद 70 धावांची खेळी साकारली. मात्र, तरीही त्याच्या संघाला पराभवाचा धक्का बसला.
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स (Los Angeles Knight Riders) संघाची सुरुवात या सामन्यात खूपच खराब झाली होती. सलामीवीर जेसन रॉय आणि उन्मुक्त चंद हे पुन्हा एकदा अपयशी ठरले. रॉयने 7 धावा, तर उन्मुक्तने 18 धावा केल्या. नितीश कुमार हादेखील 9 धावा करून बाद झाला. यानंतर रायली रुसो आणि आंद्रे रसेल यांनी डाव सांभाळत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी रचली.
रसेलचे 6 षटकार
रुसो 30 चेंडूत 41 धावा करून 19व्या षटकात तंबूत परतला. तसेच, आंद्रे रसेल याने वादळी फलंदाजी करत 37 चेंडूत 70 धावांचा पाऊस पाडला. त्याच्या या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. रसेलच्या 70 धावांपैकी 60 धावा या चौकार-षटकारांमधून आल्या. रसेलने गगनचुंबी षटकारांनी आपले अर्धशतक झळकावले. यादरम्यानचा एक षटकार एवढा लांब होता की, चेंडू थेट मैदानाबाहेरील पार्किंगमध्ये जाऊन पडला. रसेल शेवटपर्यंत नाबाद राहिला. मात्र, त्याची ही खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यामुळे संघाला 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
Dre Russ leads the charge⚡ with his quickfire 7️⃣ 0️⃣ (3️⃣ 7️⃣ ) taking @lakriders to 175 runs in the first game at Church Street Park🏞️
Will @wshfreedom be able to chase this down?🤔 pic.twitter.com/S0YREUp3oJ
— Major League Cricket (@MLCricket) July 20, 2023
वॉशिंग्टन फ्रीडमचा विजय
खरं तर, लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघाच्या 176 धावांचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडम संघाने 18.1 षटकात 176 धावा करत आव्हान गाठले. त्यांच्याकडून मॅथ्यू शॉर्ट याने 35 चेंडूत 43 धावा केल्या, तर एंड्रियेस गूजने 15 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. तसेच, ग्लेन फिलिप्स यानेही 19 चेंडूत 29 धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला. अशाप्रकारे वॉशिंग्टन संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला.
रसेल सामनावीर
नाईट रायडर्स संघ हा सामना पराभूत झाला असला, तरीही रसेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. खरं तर, मेजर लीग क्रिकेट 2023 (Major League Cricket 2023) स्पर्धेत नाईट रायडर्स संघ एकही सामना जिंकू शकला नाहीये. त्यांना सलग 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत नाईट रायडर्स संघ तळाशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
BANW vs INDW : Toss जिंकत बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय, भारत वनडे मालिका जिंकण्यापासून एक पाऊल दूर
आपला Record उद्ध्वस्त होताच सचिनकडून विराटचे कौतुक; म्हणाला, ‘आणखी एक दिवस…’