इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू खेळले, ज्यांनी त्यांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम नावावर केले. त्यापैकीच एक म्हणजे ख्रिस गेल होय. गेल त्याच्या वादळी खेळीसाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा जागेवर उभे राहून चेंडू मैदानाबाहेर पाठवला आहे. गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. अशात या संघाकडून खेळतानाच्या आठवणींना उजाळा देत त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ख्रिस गेल (Chris Gayle) म्हणाला आहे की, आरसीबी संंघासोबत खेळून त्याला मजा आली. आरसीबी नेहमीच माझा संघ राहील. पुढे तो असेही म्हणाला की, आयपीएलची ट्रॉफी आरसीबीने आपल्या नावावर केली पाहिजेत.
आयपीएल 2023 मिनी लिलावादरम्यान तो म्हणाला की, “आरसीबी संघात फक्त विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच नाहीत, तर इतर अनेक खेळाडूंसोबत मी आनंद लुटला. मी सर्फराज खान, मनदीप सिंग आणि केएल राहुल यांना भेटलो. हे खेळाडूदेखील चांगले होते. निश्चितरीत्या विराट आणि एबीडीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे खूपच शानदार होते. आम्ही एकमेकांकडून शिकत होतो.” गेलचे असे म्हणणे आहे की, बेंगलोर नेहमीच त्याचा संघ असेल.
‘आरसीबीने ट्रॉफी जिंकावी’
पुढे बोलताना गेल म्हणाला की, “आम्हाला ट्रॉफी जिंकायची होती मात्र असे झाले नाही. माझी इच्छा आहे की, आरसीबीने ट्रॉफी जिंकावी. आरसीबी नेहमीच माझा संघ राहिला आहे. मला हा संघ खूप आवडतो आणि मला या संघाचा भाग होता आला, त्याबद्दल मी खूप खुश आहे.”
ख्रिस गेल याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासोबत केली होती. मात्र त्याला या लीगमध्ये खरी ओळख रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळताना मिळाली. 2011च्या लिलावात गेलला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. मात्र, नंतर आरसीबीने डर्क नॅनेस (Dirk Nannes) याच्या जागी गेलला संघात सामील केले होते. बेंगलोर संघासाठी हा टर्निंग पॉईंट ठरला. गेलने बेंगलोरकडून खेळताना दमदार कामगिरी केली. त्याने बेंगलोरकडून अनेक हंगामात फलंदाजी केली. तसेच, यादरम्यान अनेक मोठे विक्रमही रचले. 2013च्या हंगामात त्याने 175 धावांची विस्फोटक खेळी केली होती. ही खेळी आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी खेळी आहे. पुढे सन 2018च्या हंगामानंतर ख्रिस गेल पंजाब किंग्स संघाच्या ताफ्यात गेला. तसेच, त्याने पंजाबकडून काही हंगामही खेळले.
गेलची आयपीएल कारकीर्द
गेलच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 142 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 39.72च्या सरासरीने 4965 धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 शतके आणि 31 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, नाबाद 175 ही त्याची आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (cricketer chris gayle recalls his playing days with rcb)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम