क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलेशिया येथे 2008मध्ये खेळला गेलेला 19 वर्षांखालील विश्वचषक भारताने जिंकला होता. यामध्ये विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांसारख्या स्टार खेळाडूंचाही समावेश होता. यामध्येच आणखी एका खेळाडूने आपल्या प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलमध्ये त्याने चांगलेच नाव कमावले होते. आता याच खेळाडूने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
कोण आहे तो खेळाडू?
मुंबई संघाचा फिरकीपटू इकबाल अब्दुल्ला (Iqbal Abdulla) असे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूचे नाव आहे. इकबालने 33 वर्षांच्या वयात क्रिकेटला रामराम ठोकला आहे. अष्टपैलू अब्दुल्ला आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडूनही खेळला होता. त्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले होते. अब्दुल्लाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईव्यतिरिक्त मिझोरम, सिक्कीम, केरळ आणि उत्तराखंड यांच्याकडूनही क्रिकेट खेळले आहे.
सोशल मीडियावरून दिली माहिती
इकबालने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सदैव कृतज्ञ, गुड बाय म्हणणे सोपे नाही.”
Forever grateful, it’s not easy to say Good Bye. @MumbaiCricAssoc @BCCIdomestic @BCCI @KKRiders @rajasthanroyals @RCBTweets pic.twitter.com/N3oP4R9M7p
— SAYYED IQBAL ABDULLAH (SIA) (@iqqiabdullah) October 20, 2023
“जड अंत:करणाने या प्रतिस्पर्धी खेळाला निरोप देण्याची वेळ आली आहे, ज्याने मला मोठी ओळख, एक्सपोजर दिले आणि मला ते बनवले, जे आज मी आहे. मी प्रिय कुटुंबीय आणि मित्रांमुळे धन्य आहे, जे नेहमी माझ्यासोबत उभे राहतात. बूट टांगणे कधीच सोपे नसते, पण प्रत्येक गोष्टीची आपली वेळ असते,” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार प्रदर्शन
इकबाल अब्दुल्ला याच्या कारकीर्दीवर नजर टाकायची झाली, तर त्याने 71 प्रथम श्रेणी सामन्यात 29.17च्या सरासरीने 220 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त त्याने 32.20च्या सरासरीने 2641 धावाही केल्या. त्याने 98 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 27.47च्या सरासरीने 131 विकेट्स घेतल्या. तसेच, 20.98च्या सरासरीने 1196 धावाही केल्या. त्याने 104 टी20मध्ये 27.33च्या सरासरीने 86 विकेट्स आणि 17.04च्या सरासरीने 426 धावा केल्या.
अब्दुल्ला 2009-10, 2012-13 आणि 2015-16 यादरम्यान मुंबईच्या तीन रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होता. विशेष म्हणजे, तो आयपीएल 2016मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या आरसीबी संघाचाही भाग होता. (cricketer iqbal abdulla announces retirement from all formats of competitive cricket 2023)
हेही वाचा-
हिमालयाच्या पहाडात घुमला ‘जन-गण-मन’चा आवाज! पाहा अंगावर येईल काटा असा व्हिडिओ
वर्ल्डकपमध्ये अंडररेटेड समजलेल्या शमीने दाखवला इंगा, पहिल्याच बॉलवर उडवला फलंदाजाचा त्रिफळा- Video