आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास फक्त काही दिवस शिल्लक आहेत. अशात जगभरात क्रिकेट खेळले जात आहे. यादरम्यान नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक रचण्याचा विक्रम भारतीय संघाचा माजी दिग्गज युवराज सिंग याच्या नावावर आहे. त्याने 12 चेंडूत अर्धशतक केले होते. हा तोच सामना आहे, जेव्हा 2007मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात डर्बन येथे टी20 सामना खेळला जात होता. या सामन्यात युवराज सिंग याने सहा चेंडूत सहा षटकार खेचले होते. या विक्रमाला आता 16 वर्षे उलटले आहेत. मात्र, हा विक्रम मोडणे तर दूरच, याची बरोबरीही आतापर्यंत जगातील कुठलाही फलंदाज करू शकला नाहीये.
असे असले तरीही सध्या बांगलादेश विरुद्ध आयर्लंड (Bangladesh vs Ireland) संघात टी20 मालिका खेळली जात आहे. यामध्ये लिटन दास (Litton Das) याने वेगवान अर्धशतक ठोकले आहे. यामुळे लिटनच्या नावावर खास विक्रमाची नोंदही झाली आहे. उभय संघात खेळला गेलेल्या सामन्यावर पावसाचे सावट पसरले होते. त्यामुळे 20 ऐवजी 17 षटकांचा सामना खेळवण्यात आला.
A fiery knock from Litton Das 🔥 #BANvIRE | Scorecard: https://t.co/hjpylZJUZ0 pic.twitter.com/qgJY2H7ew5
— ICC (@ICC) March 29, 2023
या सामन्यात बांगलादेशकडून लिटन दास आणि रॉनी तालुकदार यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी येताक्षणीच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. लिटनने तडाखेबंद खेळी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे बांगलादेशसाठी सर्वात वेगवान टी20 अर्धशतक ठरले. बांगलादेशकडून यापूर्वी मोहम्मद अश्रफुल याने 2007मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक केले होते. आता लिटन याने हा विक्रम मोडीत काढला आहे. मात्र, सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सर्वात शेवटी आहे.
बांगलादेशने आयर्लंडविरुद्ध ठेवले भलेमोठे आव्हान
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर रॉनी तालुकदार याने 23 चेंडूत 44 धावांची खेळी साकारून बाद झाला. लिटन आणि रॉनीमध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 124 धावांची भागीदारी रचली गेली. यानंतर कर्णधार शाकिब अल हसन याने लिटनची साथ दिली. मात्र, त्यांच्यात फक्त 14 धावांचीच भागीदारी होऊ शकली. लिटन दास 41 चेंडूत 83 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यानंतर शाकिबने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. तसेच, तौहीद रिदाय याने 24 धावांचे योगदान दिले. यावेळी बांलादेशने 17 षटकात 3 विकेट्स गमावत 202 धावांचे आव्हान उभे केले.
विशेष म्हणजे, मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने डकवर्थ-लुईस नियमानुसार 22 धावांनी विजय मिळवला होता. आता मालिकेतील अखेरचा सामना 31 मार्च रोजी खेळला जाईल. याच दिवशी आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
लिटन दास याच्या आयपीएल संघाविषयी बोलायचं झालं, तर आयपीएल 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. केकेआरचा स्पर्धेतील पहिला सामना 1 एप्रिल रोजी पंजाब किंग्स संघाविरुद्ध होणार आहे. (cricketer liton das fastest for bangladesh in t20is fifty from 18 balls against ireland)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर पंतची रिप्लेसमेंट मिळालीच, ‘या’ पठ्ठ्याची दिल्लीच्या ताफ्यात एन्ट्री
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये रोहितला पछाडत विराटची गरुडझेप, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फिफ्टीनंतर मोठा फायदा