आयपीएलमध्ये सर्वात जास्त वयात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून प्रवीण तांबेला ओळखले जाते. तांबेने २०१३ साली वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. आता तांबेबद्दल महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तांबेवर लवकरच एक बायोपिक प्रदर्शित होणार आहे.
भारतात क्रिकेटला एका धर्मासारखं मानलं जातं. या देशात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी जन्म घेतलाय. त्यात सुनील गावसकर, सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यांनी आपल्या फलंदाजीने मैदान गाजवत अफलातून स्टारडम मिळवले आहे. मात्र, दुसरीकडे प्रवीण तांबेला (Pravin Tambe) ती प्रसिद्धी मिळवता आली नाही. असे असले, तरीही अनेकांसाठी तो प्रेरणा बनला आहे. यामुळेच त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत आहे. त्याच्या बायोपिकचं नाव ‘कौन प्रवीण तांबे’ आहे.
या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले आहे. ही बायोपिक १ एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्याने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले असले, तरीही त्याला या स्पर्धेत खास कामगिरी करता आली नाही. इतकेच नाही, तर त्याने आयपीएलमध्ये एकही हॅट्रिक घेतलेली नाहीये. त्याच्या आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने ३३ सामने खेळताना ७.७५ च्या इकॉनॉमी रेटने २८ विकेट्स घेतल्या आहेत.
बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे म्हणाला की, प्रवीण तांबे यांची भूमिका साकारणे हे माझे भाग्य आहे. “‘इकबाल’मध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर १७ वर्षांनी पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारताना मी खूप भाग्यवान समजतो. भूमिका आणि कथेने मला आयुष्यात एकदाच संधी दिली आणि चित्रीकरणाचा प्रत्येक मिनिट मला खूप आवडला,” असे तो म्हणाला.
सीपीएलमध्येही केलीये कमाल
प्रवीण तांबेने २०२० मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला होता. या स्पर्धेत खेळणारा तो पहिला भारतीय ठरला. क्रिकेट चाहते त्याच्या बायोपिकबद्दल खूप उत्सुक आहेत. कारण, या फिरकीपटूला अनेक विचित्र परिस्थितींचा सामना करावा लागला होता.