भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावरही जाणार आहे. आयर्लंड मालिकेसाठी डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगची भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत रिंकूने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वादळी फलंदाजी केली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी 14 जुलै रोजी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी घोषित झालेल्या भारतीय संघातही रिंकूला जागा मिळाली होती. म्हणजेच, रिंकूला 18 दिवसात 2 वेळा भारतीय संघात निवडले गेले आहे. मात्र, अद्याप त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण बाकी आहे.
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेत 25 वर्षीय रिंकू सिंग (Rinku Singh) याने एका षटकात 5 षटकार मारण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तो एका रात्रीत स्टार झाला होता. आयर्लंड दौऱ्याविषयी बोलायचं झालं, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तो दीर्घ काळापासून पुनरागमन करत आहे.
काय म्हणाला रिंकू?
माध्यमांशी बोलताना रिंकू म्हणाला की, “केकेआर संघ व्यवस्थापन आणि फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी मला खूप पाठिंबा दिला. मी नेट्समध्ये दररोज 5 ते 6 तास फलंदाजी करायचो आणि नवीन फटकेही शिकायचो. मला वाटते की, 3 वर्षांमध्ये मला एक अष्टपैलू फलंदाज बनवले गेले. मी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले. ओळख मिळाली आणि आता मला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे.”
‘आम्ही आताही रडू लागतो’
रिंकूने असेही सांगितले की, “मी 6 वर्षांपासून केकेआरसोबत आहे. सुरुवातीला मला संधी मिळाली, पण मी त्यांचा फायदा घेण्यात अपयशी ठरलो. मी संघासोबत आपल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये खूप काही शिकलो आहे. मी मुंबईत केकेआर अकादमीत अभिषेक नायरसोबत फलंदाजीवर खूप मेहनत घेतली. ती सर्व मेहनत आता फळाला आली आहे. ही एक खूपच अद्भूत भावना आहे, जी शब्दांमध्ये व्यक्त करणे माझ्यासाठी सोपे नाहीये. मी एक भावूक व्यक्ती आहे. जेव्हाही मी माझ्या आई-वडिलांशी बोलतो, तेव्हा आम्ही रडू लागतो.”
आयपीएल 2021मध्ये मिळाली नव्हती संधी
रिंकू सिंग याचा आयपीएलमधील प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. पहिल्या 3 हंगामात त्याला छाप सोडण्यात अपयश आले होते. यादरम्यान त्याने 77 धावा केल्य. 2021मध्ये त्याला एकही सामना खेळता आला नव्हता. आयपीएल 2022च्या दुसऱ्या टप्प्यात त्याला संधी मिळाली, पण संघ पराभूत होत राहिला. आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम रिंकूच्या क्रिकेट कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला. त्याने 14 सामन्यात 59.25च्या सरासरीने आणि 149.53च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता. (cricketer rinku singh on team india selection ind vs ire t20i series read here)
महत्त्वाच्या बातम्या-
कपिल पाजींच्या ‘अहंकार’ विधानावर जडेजाचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माजी खेळाडूंना पूर्ण…’
ब्रॉडने अखेरच्या सामन्यात केला दुर्मिळ रेकॉर्ड, कुणीच मोडू शकणार नाही ‘हा’ विक्रम!