---Advertisement---

प्रेम हे! लग्नानंतर चांगलाच चमकला ऋतुराज, पत्नीचा जर्सी नंबर घालून ठोकलं झंझावाती अर्धशतक

On: शुक्रवार, जून 16, 2023 3:43 PM
Ruturaj-Gaikwad-And-Utkarsha-Pawar
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स आमने-सामने होते. गुरुवारी (दि. 15 जून) पुण्याच्या एमसीए, गहुंजे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली पुणेरी बाप्पा संघाने दमदार खेळ दाखवला. यादरम्यान ऋतुराजच्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले गेले. सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.

पत्नी उत्कर्षा पवारच्या जर्सी नंबरसह मैदानात
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि पवन शाह (Pawan Shah) यांनी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी डावाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी शानदार भागीदारी रचली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 10 षटकातच 110 धावांचा पाऊस पाडला. यावेळी ऋतुराजने 22 चेंडूत अर्धशतक साकारले. तसेच, सामन्यात 27 चेंडूत 64 धावा कुटल्या. यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यावेळी ऋतुराजची एक गोष्ट लक्षवेधी ठरली.

या सामन्यात तो त्याची पत्नी उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) हिच्या नंबरची जर्सी (13) परिधान करून मैदानात उतरला होता. तसं पाहिलं, तर ऋतुराज 31 नंबरची जर्सी परिधान करतो. आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, या जोडप्याचं कौतुक करतानाही दिसत आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जून रोजी ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार (Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar) यांनी लग्नगाठ बांधली होती. ऋतुराज लग्नामुळे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडला गेला नव्हता. त्याच्या जागी यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) इंग्लंडला रवाना झाला होता.

सामन्याविषयी थोडक्यात
सामन्यात पुणेरी बाप्पाचा सलामीवीर पवन शाह याने 48 चेंडूंचा सामना करताना 57 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकारही होता. सूरज शिंदे आणि यश क्षीरसागर यांनी पुण्याला विजय मिळवून दिला. सूरजने 11, तर यशने नाबाद 48 धावा केल्या. यावेळी कोल्हापूरकडून श्रेयस चव्हाण आणि तरणजीत सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

तत्पूर्वी नाणेफेक गमावत कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना 144 धावा चोपल्या होत्या. कोल्हापूरकडून अंकित बावणे याने 57 चेंडूत 72 धावांची खेळी साकारली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर कोल्हापूर 7 विकेट्स गमावत 144 धावांचा टप्पा गाठला होता. कर्णधार केदार जाधव (Kedar Jadhav) याने सामन्यात 22 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले होते. यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. (cricketer ruturaj gaikwad batting with wife jersey number in mpl scoring blasting 64)

महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---