भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने जेव्हापासून नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे, तेव्हापासून तो संघाला वेगाने विजय मिळवून देत आहे. इतकेच नाही, तर त्याच्या घातक फलंदाजीमुळे जगभरात त्याचे चाहते पाहायला मिळतात. रोहितचा खास विक्रम म्हणजे, त्याने वनडे क्रिकेटच्या इतिहासात ३ वेळा द्विशतकांचा पाऊस पाडला आहे. मात्र, आता निवडकर्ते त्याच्यासारख्याच एका घातक फलंदाजाचा शोध घेत आहेत, जो भारतीय संघाला भविष्यात मजबूत संघ बनवू शकेल. रोहित सध्या ३४ वर्षांचा आहे. त्याच्या अनुभवासोबतच संघाला युवा खेळाडूंचीही आवश्यकता आहे. अशात भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, ज्याच्यात विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत धावांचा पाऊस पाडण्याची क्षमता आहे.
भारतीय संघाला मिळणार दुसरा रोहित शर्मा
रोहित शर्मा (Rohit Sharma) संपूर्ण जगातील असा फलंदाज आहे, ज्याने ३ वनडे द्विशतकांसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच, तो फलंदाजीतून धावांचा रतीब घालण्यासाठी ओळखला जातो. मात्र, आता निवडकर्त्यांना चिंता सतावतेय की, रोहितने वयाची तिशी (३४ वर्षे) ओलांडली आहे. तसेच, त्याच्यांतर संघात असा कोणी धाकड फलंदाज नाही, जो त्याच्याप्रमाणे डाव सांभाळू शकेल. मात्र, आता ही चिंता मिटताना दिसत आहे. कारण, भारतीय संघाला रोहितसारखाच एक घातक फलंदाज मिळाला आहे, जो आपल्या कामगिरीमुळे सर्वांच्या मनात खास स्थान बनवत आहे. रोहितसारखी घातक फलंदाजी करणारा हा फलंदाज इतर कोणी नाही, तर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आहे. मात्र, ऋतुराजचे नशीब त्याला साथ देत नाहीये. त्याला आधीच भारतीय संघात खूप कमी संधी मिळाली आहे आणि त्यातही तो अधिकवेळा दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे.
ऋतुराज घेऊ शकतो रोहित शर्माची जागा
ऋतुराज भारतीय संघाच्या युवा फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएल २०२१मध्ये चेन्नईकडून फलंदाजी करताना धुमाकूळ घातला होता. त्याने आयपीएल २०२१मध्ये आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १६ सामन्यांमध्ये ६३५ धावा केल्या होत्या. तसेच, त्याच्या नावावर ऑरेंज कॅपही होती. त्याची फलंदाजी पाहून असे वाटते की, भारतीय संघाला दुसरा रोहित मिळाला आहे. तसेच, तो सलामीलाही फलंदाजी करू शकतो.
फलंदाजी आहे रोहितपेक्षाही सरस
रोहित कदाचित विश्वचषक २०२३नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. मात्र, त्याच्यानंतर भारतीय संघाला त्याच्यासारख्याच फलंदाजाची गरज आहे. अशात संघाला २४ वर्षांच्या ऋतुराज गायकवाडच्या रूपात एक आक्रमक फलंदाज मिळाला आहे, जो रोहितपेक्षाही घातक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. येत्या काही दिवसांमध्ये तो भारतीय संघाचा सर्वोत्तम सलामीवीर बनू शकतो.
ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचं झालं, तर तो आता रोहित शर्माप्रमाणे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली धडे घेत आहे. त्याने २२ आयपीएल सामने खेळताना ४६.६१च्या सरासरीने ८३९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकेही ठोकली आहेत.