सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. क्वालिफायर फेरीत एका फलंदाजाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून झिम्बाब्वेचा 36 वर्षीय विस्फोटक फलंदाज सीन विलियम्स आहे. गुरुवारी (दि. 29 जून) क्वालिफायर फेरीच्या सुपर 6मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ओमान सामना खेळला गेला. या सामन्यात विलियम्सने वादळी शतक झळकावले. विशेष म्हणजे, यासह त्याने एक खास कारनामाही केला.
ओमान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या सीन विलियम्स (Sean Williams) याने वादळी फलंदाजी केली. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विलियम्सने 81 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 10 चौकारांच्या कारकीर्दीतील 8वे शतक झळकावले.
हे सीन विलियम्सचे स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. सध्या स्पर्धेत तो सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी निकोलस पूरन असून त्याच्या नावावर 2 शतके आहेत. त्याने ओमानविरुद्ध 103 चेंडूंचा सामना करताना तब्बल 142 धावांचा पाऊस पाडला. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 10 चौकारांचीही बरसात केली. ओमानचा गोलंदाज फय्याज बट याने विलियम्सला कश्यप प्रजापती याच्या हातून झेलबाद करत विलियम्सला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 160पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या नावावर 5 सामन्यात 532 धावा झाल्या आहेत. या धावा त्याने 148.60च्या स्ट्राईक रेटने चोपल्या आहेत.
विलियम्सचे शानदार प्रदर्शन
विलियम्ससाठी सध्या सुरू असलेली स्पर्धा शानदार ठरत आहे. त्याने नेपाळ (102*) आणि अमेरिका (174) या संघांविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. याव्यतिरिक्त नेदरलँडविरुद्ध त्याने 91 धावांची झंझावाती खेळीही केली होती. ओमानविरुद्धही विलियम्सचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 332 धावांचा डोंगर उभारला.
विशेष म्हणजे, त्याने ओमानविरुद्ध वनडे कारकीर्दीतील दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या उभारली. त्याने अमेरिकेविरुद्ध साकारलेली 174 धावांची खेळी त्याची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच, आता ओमानविरुद्ध केलेली 142 धावांची खेळी त्याची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. खरं तर, त्याने 2023मध्ये तिसरे शतक ठोकत शुबमन गिल आणि फखर जमान यांची बरोबरी केली. भारतीय सलामीवीर शुबमनने आणि पाकिस्तानचा फलंदाज जमाननेही 2023मध्ये आतापर्यंत वनडे प्रत्येकी 3 शतके झळकावली आहेत. (Cricketer sean williams hit third century in icc world cup 2023 qualifier match between zim vs oman)
महत्वाच्या बातम्या-
‘विराटवर जळतो गंभीर, त्याचं यश पचवू शकत नाही…’, पाकिस्तानी खेळाडूने आगीत ओतलं तेल
MPL : अर्रर्र! क्लीन बोल्डचा निर्णयही थर्ड अंपायरलाच द्यावा लागला, पण का ओढवली अशी वेळ?