कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शाय होप नावाचं वादळ घोंगावलं आहे. शाय होप याने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत सीपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक ठोकले. एवढंच नाही, तर शाय होपने रहकीम कॉर्नवॉल याच्या एकाच षटकात 32 धावांचाही पाऊस पाडला. त्यामुळे गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघाने एकतर्फी सामन्यात बार्बाडोस रॉयल्स संघाला 88 धावांनी पराभवाचा धक्का दिला.
शाय होपचे वादळ
सीपीएल 2023 (CPL 2023) स्पर्धेच्या 30व्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध बार्बाडोस रॉयल्स (Guyana Amazon Warriors vs Barbados Royals) संघ आमने-सामने होते. या सामन्यात वॉरियर्स संघाकडून फलंदाजी करताना शाय होप (Shai Hope) याने पहिल्या चेंडूपासूनच जबरदस्त फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत अवघ्या 41 चेंडूत शतक साकारले. आपल्या या खेळीदरम्यान त्याने 240च्या स्ट्राईक रेटने खेळताना 8 गगनचुंबी षटकार आणि 9 चौकारांचा पाऊसही पाडला. म्हणजेच, या पठ्ठ्याने तब्बल 84 धावा या चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केल्या. होपने सामन्यात 44 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी साकारली.
Shai Hope – 69* (35) then 4,6,6,6,4,6 in a single over to bring his century in just 41 balls. pic.twitter.com/KaEP8GKJPt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 18, 2023
स्पर्धेतील दुसरे वेगवान शतक
शाय होप याने त्याच्या खेळीदरम्यान सीपीएलमधील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्याने सीपीएलच्या इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान शतक झळकावले. यष्टीरक्षक फलंदाज होपने या हंगामात आतापर्यंत सर्वात वेगवान शतक ठोकण्याचाही विक्रम केला. स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आंद्रे रसेल याच्या नावावर आहे. त्याने 2018मध्ये 40 चेंडूत वेगवान शतक केले होते.
वॉरियर्स संघाचा एकतर्फी विजय
शाय होप याच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर ऍमेझॉन गयाना वॉरियर्स संघाने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोस रॉयल्स संघ 6 विकेट्स गमावत 138 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना वॉरियर्स संघाने 88 धावांनी जिंकला. वॉरियर्सकडून गोलंदाजी करताना इम्रान ताहिर याने 4 षटकात 23 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (cricketer shai hope scored 2nd fastest hundred hits 32 runs in rahkeem cornwall over in cpl 2023)
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटसह ‘या’ भारतीय खेळाडूंच्या बायोपिकसाठी तमन्नाने निवडले साऊथ सुपरस्टार्स, पाहा यादी
‘गजिनी’ रोहित! बसमध्ये बसताना कॅप्टन हॉटेलमध्येच विसरला ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, सहकाऱ्यांनी घेतली मजा- Video