शनिवारी (दि. 08 जुलै) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील दुसरा वनडे सामना चट्टोग्राम येथे पार पडला. हा सामना अफगाणिस्तान संघाने 142 धावांनी खिशात घातला. तसेच, मालिकाही नावावर केली. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तान 2-0ने आघाडीवर आहे. या सामन्यात बांगलादेश संघाला पराभूत व्हावे लागले असले, तरीही संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने या कामगिरीसह शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि अनिल कुंबळे यांसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
शाकिब अल हसन 400 विकेट्स
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शानदार गोलंदाजी करताना 10 षटकात 50 धावा खर्चून 2 विकेट्स नावावर केल्या. यावेळी त्याने शतकीय खेळी साकारणाऱ्या रहमानुल्लाह गुरबाज आणि राशिद खान यांना तंबूचा रस्ता दाखवला. या दोन विकेट्स घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याच देशात शाकिब अल हसन 400 विकेट्स (Shakib Al Hasan 400 Wickets) पूर्ण करणारा खेळाडू बनला. आपल्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट्स पूर्ण करणारा शाकिब जगातील 9वा गोलंदाज बनला.
वॉर्न-मुरलीधरनच्या पंक्तीत विराजमान
शाकिब बांगलादेशमध्ये 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा फक्त पाचवा फिरकीपटू बनला आहे. यासोबतच बांगलादेशच्या माजी कर्णधाराने स्वत:चे नाव दिग्गजांच्या यादीत नोंदवले आहे. मायदेशात 400 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. शाकिबने ही कामगिरी रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याला तंबूत पाठवत केली.
बांगलादेशचा दारुण पराभव
शाकिबने शानदार कामगिरी करूनही बांगलादेशच्या पदरी निराशाच पडली. बांगलादेश संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तान संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 331 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघ 43.2 षटकात 10 विकेट्स गमावत 189 धावाच करू शकला. यावेळी अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी शतक ठोकत अफगाणिस्तानसाठी पहिल्या विकेटसाठी 256 धावांची मोठी भागीदारी रचली. तसेच, गोलंदाजीत मुजीब उर रहमान (3 विकेट्स), फजलहक फारुकी (3 विकेट्स) आणि राशिद खान (2 विकेट्स) यांनी कमाल केली. (cricketer shakib al hasan became fifth spinner to completes 400 international wickets at home)
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा धोनी माजी क्रिकेटपटूच्या पत्नीला म्हणालेला, ‘वहिनी मला फक्त 30 लाख कमवायचे आहेत, कारण…’
टीम इंडियाच जिंकणार ODI World Cup, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी, ‘या’ खेळाडूला म्हटले हुकमी एक्का