भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरा वनडे सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पडला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाचे धुरंधर विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी शतक झळकावले. यानंतर सर्व स्तरातून या दोन खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, त्यांच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावणारे व्यक्ती कधीच समोर येत नाहीत. म्हणजेच, जे सपोर्ट स्टाफमध्ये असतात, ते रात्रंदिवस संपूर्ण भारतीय संघासाठी कसून मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीला हवी तशी ओळख मिळत नाही. अशात विराट आणि गिलने मोठे पाऊल उचलत तिसऱ्या वनडेतील विजयानंतर आपल्या यशात सामील असणाऱ्या ‘स्पेशल थ्री’ व्यक्तींची ओळख जगाला करून दिली.
भारतीय संघाचे हे ‘स्पेशल थ्री’ व्यक्ती इतर कुणी नसून सपोर्ट स्टाफमध्ये सामील असलेले रघुवेंद्र, नुवान सेनेविरत्ने आणि दयानंद आहेत. हे तिघेही थ्रो डाऊन स्पेशलिस्ट (Thorwdown Specialist) आहेत. ते नेट्समध्ये तासंतास भारतीय फलंदाजांकडून फलंदाजीचा सराव करून घेतात. रघु आणि नुवान थ्रो डाऊनदरम्यान ताशी 150 किमीच्या गतीने भारतीय फलंदाजांना चेंडू टाकतात. त्यांच्या या क्षमतेवर विराटदेखील फिदा आहे.
विराटने ‘स्पेशल थ्री’ची करून दिली ओळख
बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताच्या विजयानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत विराट आणि गिल यांनी भारताच्या या ‘स्पेशल थ्री’ व्यक्तींची ओळख करून दिली. यावेळी विराट म्हणाला की, “खरं सांगायचं झालं, तर नुवान, दया आणि रघु आम्हाला दररोज जागतिक स्तरावरील सराव देतात. ते नेट्समध्ये आम्हाला दररोज आव्हान देतात आणि सांगतात की, सामन्यात आम्ही कशाप्रकारे ताशी 150 किमीच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे. खरं तर, माझ्या कारकीर्दीत या तिघांनी मोठे अंतर निर्माण केले आहे.”
‘माझ्या यशामध्ये तीन व्यक्तींचे खास योगदान’
पुढे बोलताना विराट म्हणाला की, “मी आधीसारखा क्रिकेटपटू होतो आणि आज जिथे आहे, त्यामध्ये सपोर्ट स्टाफमध्ये सामील असलेल्या या तीन सदस्यांची महत्त्वाची भूमिका आहे. आज मी जिथे आहे, त्याचे अधिकतर श्रेय यांनाच जाते. मला वाटते की, शुबमनही असाच विचार करत असेल. तुम्ही या चेहऱ्यांना कायम आठवणीत ठेवले पाहिजे. कारण, आमच्या यशामागे हेच लोक आहेत.”
दुसरीकडे, शुबमन गिल म्हणाला की, “मला वाटते की, या तिघांनी मिळूनच 1200 ते 1500 विकेट्स घेतले असतील. हे तिघे आमच्यासोबत खूपच मेहनत घेतात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत आम्हाला कशी फलंदाजी केली पाहिजे, त्यामध्ये समतोल साधण्यास मदत करतात.”
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकली आहे. आता भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. भारताला 18 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर उभय संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकाही खेळली जाणार आहे. (cricketer virat kohli shubman gill introduce indian cricket team throwdown specialists raghu nuwan and daya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेला तर धुतलं, आता टीम इंडियापुढं न्यूझीलंडचं आव्हान; वाचा वनडेत कोण कुणावर आहे वरचढ
बाबो! विराटच्या बॅटची ‘एवढी’ किंमत, ‘MRF’कडूनच वर्षाला मिळतात कोट्यवधी रुपये






