वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना 20 जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास आहे. कारण, विराट कोहली 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. विराट, पोर्ट ऑफ स्पेन येथील हा सामना यादगार बनवण्याचा प्रयत्न करेल. विराटने चालू मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 76 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, विराटने मागील 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कशी कामगिरी केली आहे, हे पाहूयात…
‘या’ विक्रमात बनणार भारताचा चौथा खेळाडू
विराट कोहली (Virat Kohli) वेस्ट इंडिज (West Indies) संघाविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून मैलाचा दगड पार करणार आहे. विशेष म्हणजे, मैदानात उतरताच तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), एमएस धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होईल. विराट 500 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा चौथा खेळाडू बनेल.
सचिनने त्याच्या कारकीर्दीत 664, तर धोनीने 535 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच, भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड याने 503 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विराटचा 499 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. मागील 15 वर्षांच्या काळात विराट भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे.
सन 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या विराटने 499 आंतरराष्ट्रीय सामन्यात 75 शतकांसोबत 25461 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिननंतर दुसऱ्या स्थानी आहे. 558 डावांमध्ये विराटच्या नावावर 2522 चौकार आणि 279 षटकारांची नोंद आहे.
‘किंग’ नावाने प्रसिद्ध असलेल्या विराट कोहली याने 110 कसोटी सामन्यांच्या 186 डावांमध्ये 11 वेळा नाबाद राहून 48.89च्या सरासरीने 8555 धावा केल्या आहेत. यामध्ये 28 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 955 चौकार आणि 24 षटकार मारले आहेत. तसेच, क्षेत्ररक्षण करताना त्याने 110 झेलही पकडले आहेत.
दुसरीकडे वनडे क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर 35 वर्षीय विराटने 274 वनडे सामन्यात 57.32च्या सरासरीने आतापर्यंत 12898 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 46 शतके आणि 65 अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने 1211 चौकार आणि 138 षटकारही मारले आहेत. तसेच, त्याने क्षेत्ररक्षण करताना 141 झेलही पकडले आहेत.
याव्यतिरिक्त विराटच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 115 टी20 सामन्यात 52.74च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 37 अर्धशतके निघाली आहेत. टी20त विराटने 356 चौकार आणि 117 षटकारही मारले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 50 झेलांचीही नोंद आहे. (cricketer virat kohli will play 500 international match against west indies know his 499 matches records)
महत्वाच्या बातम्या-
‘विश्वचषकात भारतीय मुस्लिम पाकिस्तानला…’, माजी क्रिकेटपटूच्या विधानाने देशभरात खळबळ
कसोटी विजयानंतर रोहितला अनारकलीचा फोन; नेटकरी म्हणाले, ‘आता वडापावही…’