भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आधी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याने खुलासा केला की, संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला निवृत्तीबाबत विचार करण्यास सांगितले आहे. यादरम्यान साहा एका वरिष्ठ पत्रकारासोबतच्या वादात अडकला. साहाने खुलासा केला होता की, पत्रकार बोरिया मजूमदारने त्याच्याशी अपशब्द वापरत मेसेज केले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या तपास समितीने बोरियावर २ वर्षांची बंदीही घातली. अशातच साहाने मोठा निर्णय घेतला आहे.
वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने घेतलेला मोठा निर्णय असा की, त्याने बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) म्हणजेच कॅबला सांगितले आहे की, तो आता बंगाल संघाकडून खेळणार नाही. साहाची पत्नी रोमी मित्रा हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, साहा कॅबच्या प्रश्नांमुळे दुखावला गेला होता, ज्यामध्ये त्याच्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते.
आयपीएलपूर्वी साहाने वैयक्तिक कारणांमुळे रणजी ट्रॉफीमधून आपले नाव माघारी घेतले होते. यानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. साहाला हे आवडले नाही आणि त्यामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला.
रोमीने सांगितले की, साहाची पुन्हा एकदा रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीसाठी बंगाल संघात निवड झाली होती, परंतु त्याने राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांना फोनद्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली. दालमिया यांनी त्याला पुनर्विचार करण्यास सांगितले, परंतु साहाने स्पष्ट केले की, तो बंगालसाठी पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या स्थितीत नाहीत. कारण, त्याच्या वचनबद्धतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याव्यतिरिक्त साहाच्या सद्याच्या खेळाबद्दल बोलायचं झालं, तर तो आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स या संघाकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून चांगला खेळ दाखवला आहे. त्याने ८ सामन्यात सलामीला खेळताना ४०.१४च्या सरासरीने २८१ धावा चोपल्या आहेत.